बिहारच्या मतदार याद्यांवरून संसदेत गदारोळ कायम, दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प

बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत आजही गदारोळ कायम राहिला. या मुद्दय़ावर दोन्ही सभागृहांत साधकबाधक चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी आहे, मात्र सरकारने या मागणीला प्रतिसाद न दिल्याने विरोधकांनी दोन्ही सभागृहांत जोरदार निषेध नोंदवला.

लोकसभेत कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि फलक झळकावले. बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना बिहारमध्ये मतदार याद्यांची फेरतपासणी प्रक्रिया राबवण्यात आली. याप्रकरणी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. दोन्ही सभागृहांत कामकाज सुरू होताच विरोधकांच्या गदारोळाला सुरुवात झाली. गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

  • अधिवेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत संसदेत एकही विधेयक मंजूर होऊ शकलेले नाही. दोन क्रीडा विधेयकांवर चर्चा करण्यासाठी ही विधेयके लिस्टेड करण्यात आली. मात्र, गोंधळामुळे यावरही चर्चा होऊ शकली नाही.

ओम बिर्ला पुन्हा संतापले

पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सुरळीत कामकाज होऊ शकलेले नाही. यावरून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आजही प्रचंड संतापले. रोज आम्ही सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु विरोधक सातत्याने गोंधळ घालत आहेत. तुम्ही लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहात. त्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. जर सदस्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी मला सांगावे, परंतु प्रश्नोत्तराचा तास चालू द्यावा. अनेक प्रश्न आहेत, त्यांना सरकारला उत्तरे द्यायची आहेत, असे ते म्हणाले. परंतु, विरोधकांनी त्याकडे दुर्लक्ष करून गदारोळ कायम सुरू ठेवला. त्यामुळे अखेर कामकाज तहकूब करावे लागले.