
आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना सार्वजनिक बांधकाम विभागातील भरती घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यांच्यावरील आरोपांप्रकरणी सीबीआयच्या वतीने सादर करण्यात आलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला. कोर्टात सीबीआयने जैन यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे सांगितले. दरम्यान, तब्बल सहा वर्षांनी जैन यांना दिलासा मिळाला आहे.
पीडब्ल्यूडी विभागात भरती घोटाळा झाल्याचा आरोप करत 2019 मध्ये जैन आणि पीडब्ल्यूडीच्या काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नियमबाह्य पद्धतीने तज्ञांची नियुक्ती केल्याचे परंतु, तब्बल 4 वर्षांच्या तपासात सीबीआयच्या निदर्शनास आले की ही नियुक्ती गरजेची होती. योग्यता आणि पात्रतेच्या निकषावरच या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यात कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही.
न्यायालय काय म्हणाले?
केवळ संशयावरून पुणावरही आरोप करता येत नाहीत. मजबूत आणि ठोस पुरावा असणे गरजेचे आहे. दीर्घकाळापासून सीबीआयने याप्रकरणात तपास करूनही कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. त्यामुळे याप्रकरणात पुढील कारवाई किंवा खटला सुरू ठेवणे चुकीचे ठरेल असे सांगत न्यायालयाने हा खटला बंद केला.
भाजपने जैन यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी – आप
सीबीआयकडून अनेक वर्षे चौकशी होऊनही काहीही सापडले नाही. त्यामुळे मोदी सरकार तोंडावर आपटले, अशा शब्दांत आपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी टीका केली आहे. जेव्हा अरविंद केजरीवाल यांच्या मंत्र्यांवर खोटे गुन्हे दाखल होतात तेव्हा भाजप नेते त्यांची बदनामी करतात. पण, आज जैन यांना क्लीन चिट मिळाल्याने भाजपने जैन यांच्या कुटुंबीयांची माफी मागायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.