
स्वतंत्र झारखंडसाठी प्रदीर्घ लढा उभारणारे आदिवासी समाजाचे दिग्गज नेते व झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, खासदार शिबू सोरेन यांचे आज निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिबू सोरेन हे किडनीच्या विकाराने त्रस्त होते. मागील महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शिबू सोरेन यांचे चिरंजीव व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली. ‘‘आदरणीय ‘दिशोम’ गुरुजी आपल्याला सोडून गेले. आज मी सगळे काही गमावले,’’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पंतप्रधानांसह मान्यवरांची श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन सोरेन गुरुजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांनी हेमंत सोरेन यांचे सांत्वनही केले. आदिवासी हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिलेला लढा इतिहासात अजरामर राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे तर ‘‘आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी समर्पित राहिलेले शिबू सोरेन यांचे आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे,’’ अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोरेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
- शिबू सोरेन हे राज्यसभा सदस्य होते. त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
आदिवासी लढय़ाचा चेहरा… तीन वेळा मुख्यमंत्री
सोरेन हे आदिवासी हक्कांच्या चळवळीचा चेहरा होते. सावकारी पाशातून आदिवासी समाजाला मुक्त करण्याच्या चळवळीला त्यांनी नेतृत्व दिले. आदिवासी जमिनीवरील आक्रमणांना त्यांनी प्राणपणाने विरोध केला. यातून संथाल परगण्यात ते एक आख्यायिका बनले. लोक त्यांना प्रेमाने दिशोम गुरुजी (राष्ट्राचा गुरू) म्हणायचे. साठच्या दशकात त्यांनी संथाल सुधार समाज संघटना स्थापन केली होती. 1971मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राजकारणात औपचारिक प्रवेश केला. ढुमका लोकसभा मतदारसंघातून ते 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले. मनमोहन सिंग सरकारमध्ये ते कोळसा व खाण मंत्री होते. त्यांनी तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते.