
कबुतरांसाठी सरकारची फडफड आज पाहायला मिळाली. जैन समाजाच्या दबावापुढे झुकत तातडीने बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरांच्या प्रश्नावर महत्त्वाचे निर्देश पालिकेला दिले. पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत कबुतरांना बंदिस्त जागेत नियंत्रित खाद्यपुरवठा (कंट्रोल फीडिंग) सुरू ठेवावा. कबुतरखान्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने करावी, असे नमूद करतानाच पक्षीगृह उभारण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य शासन कबुतरांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात भूमिका मांडेल. तसेच गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयातही जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आणि फुप्फुसांचे आजार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कबुतरखान्यांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले. महापालिकेने दादरचा कबुतरखाना पाडण्यासाठी कारवाई सुरू केली होती. त्या कारवाईला जैन समाजाने तीव्र विरोध केल्याने महापालिकेने ताडपत्री टाकून कबुतरखाना बंद केला. जैन समाजाने त्याविरोधात रविवारी शांतिदूत यात्रा काढून पालिकेचा निषेध केला.
कबुतरखान्याचा वाद चिघळल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात या प्रश्नासंदर्भात बैठक झाली. कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबुतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. यासंदर्भात माजी पेंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
गरज भासल्यास सुप्रीम कोर्टात जाणार
कबुतरखान्याशी संबंधित मुद्दय़ांवर सध्या उच्च न्यायालयात रिट याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या विषयावर न्यायालयात राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेने आपली भूमिका मांडावी. गरज भासल्यास राज्य शासन सर्वोच्च न्यायालयातही आपली भूमिका मांडेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, काwशल्य विकास व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
- कबुतरांच्या आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आणि नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी कोणत्या वेळेत खाद्यपुरवठा व्हावा आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत नियमावली तयार करा.
- कबुतरखान्यांच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने तज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करावा.
- कबुतरांची विष्ठा साफ करण्यासाठी तांत्रिक उपायांचा विचार करावा.
- मुंबई महापालिकेने कबुतरांसाठी पक्षीगृह उभारावे आणि त्याची देखभाल करावी.
मीरा रोडमध्ये दाणे टाकण्यावरून वृद्धावर हल्ला मुलीचा गळा दाबून रॉडने मारहाण
मीरा रोडमध्ये कबुतरांना उघडय़ावर दाणे टाकणाऱ्या एका महिलेने तिला रोखणाऱया वृद्धावर आणि त्याच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला. या वृद्धाला बेदम मारहाण सुरू असताना त्यांची मुलगी मधे पडली म्हणून तिच्यावर लोखंडी रॉडचे घाव घालत गळाही दाबला. महेंद्र पटेल आणि प्रेमल पटेल असे जखमी पितापुत्रीचे नाव असून हल्लेखोर आशा व्यास आणि तिच्या तीन साथीदारांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकूर मॉलजवळील डीबी ओझोन इमारतीत राहणाऱया आशा व्यास या कबुतरांना उघडय़ावर दाणे घालत होत्या. त्यावेळी शेजारच्या इमारतीत राहणारे महेंद्र पटेल हे दूध आणण्यासाठी खाली आले. आशा व्यास यांना त्यांनी कबुतरांना उघडय़ावर दाणे घालू नका असे सांगितले. त्यामुळे आशा व्यास यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी पटेल यांना शिवीगाळ करत वाद घातला.