
महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला नेणाऱया मोदी सरकारने निर्यातीतही गुजरातचीच भरभराट केल्याचे समोर आले आहे. देशभरात निर्यातीत गुजरात क्रमांक एकवर असून 2024-25 मध्ये या राज्याने तब्बल 9.83 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात केली असून देशभरातील एपूण निर्यातीत या राज्याचा वाटा 26.6 टक्के इतका आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. गेल्या वर्षी गुजरातने केलेल्या निर्यातीच्या तुलनेत यंदा किंचित घट झाली असली तरीही गुजरातचा यंदाचा आकडा महाराष्ट्रापेक्षा तब्बल 4.3 लाख कोटींनी अधिक आहे. महाराष्ट्राने यंदा 5 लाख 57 हजार 271 कोटींच्या उत्पादनांची निर्यात केली असून, या आकेडावारीसह महाराष्ट्र दुसऱया क्रमांकावर आहे. निर्यातीत महाराष्ट्राच्या पाठोपाठ तामीळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचा क्रमांक लागतो.
उत्तर प्रदेश सर्वात पिछाडीवर
2024-25 मध्ये उत्तर प्रदेशातून 1.86 लाख कोटींच्या उत्पादनांची निर्यात झाली. देशाच्या एपूण 37.02 लाख कोटींच्या उत्पादनांच्या निर्यातीच्या केवळ 5 टक्के निर्यात उत्तर प्रदेशातून झाली आहे. यावरून निर्यातीत उत्तर प्रदेश सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.
पेट्रोलियम, हिरे, दागिन्यांची सर्वाधिक निर्यात
गुजरातच्या जामनगर येथून सर्वाधिक 3.63 लाख कोटींच्या उत्पादनांची निर्यात करण्यात आली. येथून मोठय़ा प्रमाणावर पेट्रोलियम आणि रिफायनरी उत्पादनांची निर्यात झाली. गुजरात राज्यातून झालेल्या निर्यातीत जामनगरचा एकतृतीयांश वाटा आहे. येथून हिरे आणि दागिने, ऑरगॅनिक रसायने, औषधे आणि इंजिनीयरिंग मशिनरीची मोठय़ा प्रमाणावर निर्यात करण्यात आल्याचे समोर आले आहे.