
घरफोडी, पाकीटमारी आणि चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे मुरबाडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मुरबाडमध्ये दरोडे घालणाऱ्या टोळीला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासातील माहितीनुसार या टोळीतील चोरटे भाजी विक्रीच्या निमित्ताने मुरबाडमधील गावागावात रेकी करून दरोडे घालायचे. टोळीचा म्होरक्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुरबाड व टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपासून घरफोड्या वाढल्या आहेत. मुरबाडपासून अवघ्या आठ किमी अंतरावरील तोंडली गावातील मोतीराम पष्टे यांच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी 7 लाख 70 हजारांचा मौल्यवान ऐवज लुटला होता. त्यापाठोपाठ टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धसई गावातील जगदीश गोल्हे यांच्या घरावरही चोरट्यांनी दरोडा टाकला होता. या दरोड्याचा तपास करण्यात ठाणे पोलिसांना अपयश आले होते. मात्र रायगड पोलिसांनी या दरोड्यांचा छडा लावला. रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या कर्तव्यदक्षतेने सहा चोरट्यांना बेड्या ठोकण्यात यश आले. तालुक्यातील तोंडली, धसई गावात दरोडा टाकल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे. सातवा चोरटा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.