आम्ही बांगड्या भरल्या नाहीत! पालिका अधिकाऱ्यांचा राजकारण्यांना इशारा

मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या बैठकीत घुसून त्यांच्या अंगावर धावून गेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी निषेध सभा घेतली. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी बांगड्या भरल्या नसून, यापुढे जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अधिकाऱ्यांनी राजकारण्यांना दिला.

महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तूंची चोरी झाल्याप्रकरणी बुधवारी मनसेचे काही पदाधिकारी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मनसेचे पदाधिकारी थेट आयुक्तांच्या दालनात घुसले. त्यानंतर माजी नगरसेवक किशोर शिंदे व आयुक्त नवल किशोर राम यांच्यात जोरदार वाद झाला. या राड्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध सभा घेत राजकारण्यांवर टीका केली. या सभेला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त माधव जगताप, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते. दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी व आजी-माजी नगरसेवकांनी आयुक्तांना पाठिंबा जाहीर केला.

‘महाविकास’चे आंदोलन
महापालिका अधिकाऱ्यांनी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पालिका भवनसमोर भरपावसात आंदोलन केले. या आंदोलनात मनसेदेखील सहभागी झाली. यावेळी माजी आयुक्तांच्या आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मनसेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर, मनसे नेते बाबू वागसकर यांच्यासह चारही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी आयुक्त बंगल्यातील कमोड, वॉश बेसिन व पाण्याचे नळ सोडून उर्वरित साहित्य गायब असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने महापालिकेच्या सुरक्षा अधिकारी राकेश वीटकर यांना नवीन कमोड, वॉश बेसिन व नळ भेट देत हे साहित्य चोरी करणाऱ्या माजी आयुक्तांना पाठवून द्यावे, असे महाविकास आघाडीकडून प्रशासनाला उपरोधिकपणे सांगण्यात आले.

जनतेचे मालक असल्याची हवा डोक्यातून काढा
पालिकेचे मालक अधिकारी, कर्मचारी नव्हे, तर जनता मालक आहे. जनतेचे मालक असल्याची काही पिलावळ तयार झाली आहे. त्यांनी मालक असल्याची डोक्यातून हवा काढावी. चुकीच्या वागणुकीची संस्कृती खपवून घेणार नाही. त्यामुळे ही शेवटची संधी असल्याचा इशारा शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिला. तर, महापालिका अधिकाऱ्यांनी बांगड्या भरल्या नसून, यापुढे जसाश तसे उत्तर देऊ, असा इशारा माधव जगताप यांनी दिला.

चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
माजी आयुक्तांनी केलेली चोरी लपवण्यासाठी पालिका प्रशासनाची सुरू असलेली धडपड निषेधार्ह आहे. आयुक्त बंगल्यातील साहित्याच्या चोरीची तक्रार देण्याची मागणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो. तर, महिला अधिकाऱ्यांशी अपमानास्पद वागणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत. राजकारण्यांना पिलावळ म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढू. आयुक्त बंगल्यातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.