भाजप खासदार के सुधाकर यांच्या अडचणीत वाढ; चालकाने जीवन संपवल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल

driver-alleges-bjp-mp-in-job-scam-fir-registered-in-karnataka (1)

कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर येथे एका ३० वर्षीय चालकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजप खासदार के. सुधाकर आणि इतर दोघांची नावे घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबू नावाच्या ३० वर्षीय चालकाने गुरुवारी सकाळी आपले जीवन संपवले. त्यानंतर, त्याने लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्याची पत्नी शिल्पा हिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर (FIR) मध्ये खासदार सुधाकर आणि नागेश व मंजुनाथ यांच्यावर आर्थिक फसवणूक, जीवन संपवण्यास प्रवृत्त करणे आणि बीएनएस (BNS) तसेच अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबूने चिठ्ठीत आरोप केला आहे की, सुधाकर आणि नागेश यांनी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्याची २५ लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच, एका जिल्हा परिषद लेखा सहाय्यकाने त्याला जीवनसंपवण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही त्याने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा पंचायतीच्या मुख्य लेखा अधिकाऱ्याकडे कंत्राटी चालक म्हणून काम करत होता.

पोलीस अधीक्षक कुशल चौकसे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘चिक्कबळ्ळापूर डीसी कार्यालयाच्या परिसरात ही घटना घडली. सकाळी ८.३० च्या सुमारास एका व्यक्तीने झाडाला गळफास लावून जीवन संपवल्याची माहिती आम्हाला मिळाली.’

बाबूने आरोप केला आहे की, नागेश आणि लेखा सहाय्यक यांनी खासदारांच्या प्रभावाचा वापर करून सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी त्याच्याकडून लाखो रुपये घेतले.

या प्रकरणी अधिकाऱ्यांनी पीटीआयला माहिती दिली आहे. ‘हे आरोप गंभीर आहेत. खासदार थेट यात सहभागी आहेत की त्यांचे नाव घेऊन त्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे, याचा तपास केला जाईल. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत’, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

एफआयआरमध्ये सुधाकर यांना आरोपी क्र. १, नागेशला आरोपी क्र. २ आणि मंजुनाथला आरोपी क्र. ३ असे नाव देण्यात आले आहे.

या घटनेनंतर, खासदार सुधाकर यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या घटनेमुळे मला खूप दुःख झाले आहे, मात्र त्यांचा या घटनेशी कोणताही संबंध नाही.

ते म्हणाले, ‘चिक्कबळ्ळापूर डीसी कार्यालयात झालेल्या घटनेबद्दल मी ऐकले. मला या घटनेमुळे खूप दुःख झाले आहे. मी बाबूच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. सार्वजनिक जीवनात मी या बाबू नावाच्या व्यक्तीला कधीही भेटलेलो नाही किंवा पाहिलेले नाही.’

तीन वेळा आमदार राहिलेल्या आणि माजी मंत्री असलेल्या सुधाकर यांनी सांगितले की, त्यांनी अनेक तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी मदत केली आहे आणि त्यांचे नाव चिठ्ठीत का आले हे त्यांना समजले नाही.

भाजप खासदार म्हणाले, ‘चिठ्ठीत उल्लेख असलेल्या इतर दोन व्यक्तींबद्दलही मला कोणतीही माहिती नाही. नागेश आणि मंजुनाथ यांनी बाबूला नोकरीचे आश्वासन देऊन १० ते १५ लाख रुपये घेतल्याचे मी ऐकले आहे. मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही.’