साय-फाय – निसार मोहिमेचे यश

>> प्रसाद ताम्हनकर

जगातील मातब्बर अवकाश संस्था असलेली अमेरिकेची नासा आणि हिंदुस्थानची अवकाश संस्था इस्रो जर एकत्र आल्या तर काय चमत्कार होईल, सांगता येत नाही, असे म्हणणाऱयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त प्रयत्नांतून निसार (ऱघ्एAR म्हणजे नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार) या अवकाश मोहिमेला यशस्वी सुरुवात झालेली आहे. 30 जुलै रोजी हिंदुस्थानी वेळेनुसार संध्याकाळी 5.40 वाजता 2392 किलो वजनाचा हा उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला.

निसार मोहिमेद्वारे मिळणाऱया माहितीमुळे हिंदुस्थान आणि अमेरिकेच्या सोबतीने संपूर्ण जगाला येणाऱया नैसर्गिक आपत्तींची माहिती मिळण्यास आणि त्यांचा सामना करण्यासाठी उपाययोजना राबविण्यास मदत मिळणार आहे. नासा अवकाश संस्थेने यापूर्वी पृथ्वीचे निरीक्षण करणारे बारापेक्षा जास्त उपग्रह कार्यरत आहेत. मात्र निसार हा आजवरचा सर्वात प्रगत आणि शक्तिशाली उपग्रह रडार असेल असे नासाने नमूद केले आहे. ही मोहीम जगातील सर्वात महाग अवकाश मोहिमांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे.

निसार हा एक लो अर्थ ऑर्बिट उपग्रह आहे आणि त्याला पृथ्वीपासून 747 किलोमीटर उंचीवर स्थापित केले जाणार आहे. निसार पृथ्वीचा संपूर्ण नकाशा अचूक पद्धतीने तयार करेल आणि त्यानंतर दर 12 दिवसांनी दोनवेळा तो पृथ्वीवर होणाऱया भौगोलिक बदलांचा अभ्यास करेल आणि ती माहिती दोन्ही संस्थांना पुरवेल. त्याच्या अभ्यासामध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग, समुद्रातील हालचाली व समुद्र पातळीत होत जाणारी वाढ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बर्फाचे निरीक्षण, परिसंस्थेचा अभ्यास व त्यातील बदलाची नोंद घेणे, भूजल पातळीतील बदलांवर लक्ष ठेवणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे या उपग्रहाला दोन रडार बसविण्यात आलेले असल्याने हा उपग्रह दोन रडारांच्या माध्यमातून पृथ्वीचे निरीक्षण करणार आहे.

पृथ्वीवरील बदलांचा अभ्यास हे निसारचे महत्त्वाचे उद्दिष्ट असले तरी त्याच्या माध्यमातून त्सुनामी, भूकंप, ज्वालामुखी अशा नैसर्गिक संकटांचा अभ्यास करणे, त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवणेदेखील शक्य होणार आहे. सध्या वेगाने वितळत असलेले हिमखंड आणि त्यामुळे समुद्राच्या पातळीमध्ये होत असलेली वाढ हे जागतिक संकट बनलेले आहे. अशा वेळी निसारच्या बॅथिमॅट्रिक निरीक्षणाची फार मोलाची मदत आपल्याला मिळणार आहे. बॅथिमॅटिक निरीक्षण म्हणजे पाण्याखालील पृष्ठभागाच्या खोलीचा अभ्यास करणे. या निरीक्षणामुळे हिमनगांचे आणि हिमनद्यांचे वितळणे, समुद्राच्या भूजल पातळीत होत असलेली वाढ, पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याचे होणारे परिणाम या सर्वांचा अभ्यास करण्यास मदत मिळणार आहे.

निसारला प्रस्थापित होण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी लागणार आहे. निसार उपग्रहाचे वैशिष्टय़ म्हणजे हा उपग्रह दिवस असो वा रात्र, वातावरण ढगाळ असो किंवा पाऊस पडत असो, अगदी कोणत्याही परिस्थितीत 24 तास कार्यरत राहू शकतो. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर हवामान बदलाचे अनेक परिणाम होत असतात. काही अत्यंत सूक्ष्म असतात, तर काही डोळ्यांना स्पष्ट दिसतात. काही बदल हे अत्यंत संथ आणि हळू होत असतात, तर काही अचानक उभे ठाकतात. अशा वेळी निसारकडून मिळणारी माहितीही या बदलांचे अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी, त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. जंगलात अचानक पेटणारे वणवे, ज्वालामुखी, सुनामी अशा संकटांचा सामना करणे, आपत्कालीन व्यवस्था उभी करणे सुलभ होणार आहे.

10 वर्षांच्या अपार कष्टानंतर इस्रो आणि नासाने हा जगातील सर्वात महागडा असा उपग्रह बनविण्यात यश मिळवले आहे. या मोहिमेवर 1.5 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड खर्च झालेला आहे. निसार आपल्या कामाने किती प्रभावित करतो हे काही महिन्यांत आपल्याला दिसेलच. इस्रो आणि नासा यांना मनःपूर्वक शुभेच्छा!