
वरळीतील बीडीडीवासीयांची नव्या घराची प्रतीक्षा अखेर संपली आहे. येत्या गुरुवारी, 14 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यातील 556 रहिवाशांना नव्या घराचा ताबा मिळणार आहे. सकाळी 11 वाजता माटुंग्यातील यशवंत नाटय़मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. वरळी बीडीडीवासीयांना नव्या घरात गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी त्यांना तातडीने नव्या घराचा ताबा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. मे. टीसीसी कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत दोन टप्प्यात वरळीतील 121 चाळींचा पुनर्विकास करून 9689 घरे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 40 मजली 34 पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील एकूण 8 विंगपैकी डी आणि ई या दोन इमारतींना ओसी मिळाली असून नव्या घराचा ताबा कधी मिळणार याकडे 556 रहिवासी आशेने डोळे लावून बसले होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून गुरुवारी नव्या घराच्या चाव्या मिळणार आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्ताने वर्षानुवर्षे 160 चौरस फुटाच्या घरात राहणाऱया बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटाच्या आलिशान घरात राहण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे 1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता.
या गृहप्रकल्पास सुरुवात झाल्यापासून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दर महिन्याला प्रकल्पस्थळी भेट देऊन अधिकारी, अभियंत्यांशी चर्चा करून कामकाजाचा आढावा घेत आहेत.