
शेतकरी आता नावापुरताच राजा राहिला आहे. सत्तेच्या सारिपाटात फक्त निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो. महायुती सरकारने बडय़ा उद्योगपतींची कर्जे माफ केली. मात्र, जगाच्या पोशिंद्याला दुर्लक्षितच ठेवले. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे, त्यामुळे या विरोधात शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या सरकारला पाझर फुटणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही, तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी दिला.
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने चंदगड येथील रवळनाथ मंदिरातून आज ‘शेतकरी कर्जमुक्ती दिंडी’चा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बानुगडे-पाटील बोलत होते. याप्रसंगी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे उपस्थित होते.