
अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी वैमानिकाला दोष देणे योग्य नाही. अपघात का आणि कसा झाला हे जाणून घेण्याचा वैमानिकाचे आणि पीडितांचे कुटुंब तसेच इतर सर्वांना अधिकार आहे. बोईंग आणि इतर विमान कंपन्या अमेरिकेत प्रचंड शक्तिशाली आहेत. त्यांच्याकडे शक्तिशाली लॉबी, पीआर आणि स्पीकर्स आहेत. बोईंग हे त्यांच्या उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, अशा शब्दांत विमान अपघातातील बळींच्या वतीने बोईंगविरोधात लढणारे अमेरिकेतील वकील माइक अँड्रय़ूज यांनी घणाघाती आरोप केला आहे.
अँड्रय़ूज यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोईंग कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या मी 65 पीडित कुटुंबांची बाजू न्यायालयात मांडत आहे. यात विमानातील प्रवाशांचे आणि विमान कोसळून मृत्युमुखी पडलेल्या स्थानिकांचे कुटुंब यांचा समावेश आहे. हे ब्रिटन आणि हिंदुस्थान या दोन्ही देशांचे नागरिक आहेत, त्यांनी आमच्या लॉ फर्मशी संपर्क साधला आहे, अशी माहिती अँड्रय़ूज यांनी दिली. जर बोईंग विमानात दोष असेल तर अमेरिकेत बोईंगविरोधात खटला दाखल केला जाईल आणि सब कंपोनंट उत्पादक किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमध्ये समस्या असू शकते. मात्र, हे सर्व नेमकी त्रुटी कशात आहे, यावर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.
मायकल अँड्रय़ूज यांनी केली घटनास्थळाची पाहणी
पीडितांच्या बाजूने लढणारे अमेरिकेतील वकील मायकल अँड्रय़ूज यांनी आज सकाळी अहमदाबाद येथे ज्याठिकाणी विमान अपघाताची दुर्घटना घडली त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच मृत्युमुखी पडलेल्या विमान प्रवाशांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. अँड्रय़ूज तीन दिवस हिंदुस्थानात राहाणार असून पीडितांशी बोलणार आहेत, त्यांची बाजू ऐकून घेणार आहेत.
बोईंगमधील अनेक त्रुटी उघड
बोईंग विमानात अनेक त्रुटी असल्याचे यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांवरून उघड झाले आहे. 737 मॅक्स विमानात अनकमांडेड सॉफ्टवेअर इनपुटची घटना घडली होती. वैमानिक जे कमांड देत होता ते प्रत्यक्षात घडत असलेल्या घटनेच्या उलट होते. त्यामुळे ती तांत्रिक समस्या होती. बोईंग 787 या विमानाशी संबंधित 2 घटना घडल्या, ज्या संशयास्पद होत्या, असेही अमेरिकन वकिल अँड्रय़ूज म्हणाले.