
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमधील बेघर लोकांना तत्काळ शहराबाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. वॉशिंग्टन डीसी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व बेघरांना शहरातून बाहेर काढावे लागणार आहे. यासाठी कोणतीही उदारता दाखवणार नाही. या लोकांना शहराबाहेर काढल्यानंतर त्यांना राहण्यासाठी दुसरी जागा दिली जाईल, परंतु ही जागा वॉशिंग्टनपासून खूप दूर असेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी टथ या सोशल मीडियावर म्हटले आहे. जे गुन्हेगार आहेत, त्यांना आता कुठेही पाठवण्याची गरज नाही. त्यांची जागा थेट तुरुंगात आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगात पाठवले जाईल, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी तंबू आणि घाणीचे पह्टो शेअर करत म्हटले की, ‘मिस्टर नाईस गाय’ची वेळ नाहीये. आता राजधानी वॉशिंग्टन पुन्हा स्वच्छ आणि सुरक्षित करावी लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये वॉशिंग्टन डीसीमध्ये रस्त्याच्या कडेला लोकांनी राहण्यासाठी बांधलेले तंबू दिसत आहेत, तर रस्त्यांच्या कडेला कचरा मोठय़ा प्रमाणात दिसत आहे. एका सरकारी इमारतीच्या पायऱ्यावर झोपलेला माणूस दिसत आहे. हे सर्व फोटो ट्रम्प यांनी शेअर केले आहेत.
शहरात 3800 लोक बेघर
वॉशिंग्टन डीसी हे राज्य नसून एक जिल्हा आहे. त्यामुळे येथे संघराज्य सरकारला विशेष अधिकारी आहेत. शहरात जवळपास 3 हजार 782 लोक बेघर आहेत. यापैकी 800 लोक हे उघडय़ावर राहतात. काही लोक आश्रयगृहांमध्ये राहतात. 2025 मध्ये शहरात गुन्हेगारी वाढली असून आतापर्यंत 98 हत्या झाल्या आहेत. काही ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. कार चोरी, हल्ला आणि दरोडय़ाच्या घटनेतही वाढ झाली आहे, तर वॉशिंग्टन डीसीच्या महापौर म्युरियल बाऊसर यांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांत हिंसक गुन्हेगारी 30 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली.