
‘एक व्यक्ती, एक मत’ हा लोकशाहीचा सिद्धांत आहे, पण तो आता राहिलेला नाही. आता ’एक माणूस, अनेक मते’ असे झाले आहे. त्या विरोधात संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट होऊन लढतो आहे. हिंदुस्थानच्या तरुणाईला देखील हे कळून चुकले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला फार काळ लपता येणार नाही,’ असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिला.
इंडिया आघाडीच्या मोर्चाच्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. खासदारांना भेटण्यास निवडणूक आयोगाने नकार दिल्याबद्दल राहुल यांनी संताप व्यक्त केला. ’हिंदुस्थानच्या लोकशाहीचे हाल झाले आहेत. 300 खासदार निवडणूक आयोगाला भेटू इच्छित होते. काही कागदपत्रे देणार होते. पण, आयोगाने परवानगी नाकारली. 300 खासदार येऊ शकत नाहीत असे आयोगाने सांगितले. सत्य समोर येईल म्हणून ते घाबरतात. ही लढाई आता राजकीय राहिलेली नाही. त्यापुढे निघून गेली आहे. देशाचा आत्मा वाचवण्याची, संविधानाच्या रक्षणाची लढाई झाली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
त्यांच्या डेटासाठी मी शपथपत्र का देऊ?
‘मी जाहीर केलेली मतचोरीची आकडेवारी निवडणूक आयोगाची आहे, माझी नाही. त्यांच्याच वेबसाइटवर ती आहे, तिथून त्यांनी घ्यावी. त्यासाठी मी शपथपत्र कशाला देऊ? माझ्याकडून शपथपत्र मागून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप राहुल यांनी केला. ‘मतचोरी फक्त बेंगळुरूत झालीय असे कोणी समजू नये. देशातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात हे झाले आहे. निवडणूक आयोगालाही ते माहीत आहे. ते लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण लवकरच सगळे चव्हाटय़ावर येईल, असेही ते म्हणाले.
मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीने दिल्लीत दणदणीत मोर्चा काढून निवडणूक आयोगाला दणका दिला. संसद भवन येथून मोर्चा निघाल्यानंतर काही अंतरावरच पोलिसांनी अटकाव केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, संजय राऊत, अखिलेश यादव यांच्यासह तब्बल 300 खासदारांच्या या मोर्चाने दिल्ली दणाणून सोडली.
शिवसेनेचे सर्व खासदार मोर्चात
हातात फलक घेऊन व खास मोर्चासाठी तयार केलेल्या टोप्या घालून शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय देशमुख, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार मोर्चात सहभागी झाले होते.
खासदार भिडले, बॅरिकेडस्वर चढले!
पीटीआय कार्यालयासमोर पोलिसांनी खासदारांचा मोर्चा अडवला. तिथे बॅरिकेडस् लावण्यात आले होते. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे खासदार आक्रमक झाले. अखिलेश यादव यांनी बॅरिकेडस्वर चढून पलीकडे उडी मारली व तिथे ठिय्या दिला.
मोदी-शहा कायर है… प्रियंकांच्या घोषणाबाजीने वेधले लक्ष
खासदार प्रियंका गांधी या हिरीरीने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण मोर्चात त्या सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसल्या. टाळय़ा वाजवून मोदी-शहांवर बरसताना दिसल्या. ‘मोदी-शहा कायर है… कायर है… कायर है…, व्होट चोर गद्दी छोड… जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है…’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. पोलिसांनी अटक करून व्हॅनमध्ये बसविल्यानंतर घोषणांचा स्वर टिपेला पोहोचला होता.
कुणाल कामराने केले आयोगाचे नामकरण
मतचोरी चव्हाटय़ावर आल्यानंतर निवडणूक आयोग टीकेच्या रडारवर आला आहे. राजकीय नेत्यांबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळीही आयोगावर टीका करत आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने ‘इलेक्शन कॉम्प्रोमाइज ऑफ इंडिया’ (ECI) असे म्हणत निवडणूक आयोगावर बोचरी टीका केली आहे.
मतांची चोरी करूनच भाजप सत्तेत – सपकाळ
काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करणारा भारतीय जनता पक्ष काँग्रेसयुक्त झाला आहे. काँग्रेसचे नेते पक्षात घेतल्याशिवाय त्यांना एकही निवडणूक लढवता येत नाही. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप मतांवर डल्ला मारत आहे. विधानसभा निवडणुकीत मतांची अशी चोरी करूनच ते सत्तेवर आले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. भाजप आपल्याकडे 1 कोटी कार्यकर्ते असल्याचे सांगत आहे. तर मग नेते कशासाठी आयात करता? असा प्रश्न सपकाळ यांनी भाजपला केला.
इंडिया आघाडीचा मोर्चा रोखत खासदारांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर बसमधून या खासदारांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारात या सर्व खासदारांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते.
























































