जे. जे. रुग्णालयात नाना शंकरशेट यांच्या तैलचित्राचे अनावरण

मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षण महर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या पाऊलखुणा आज जे. जे. रुग्णालयात उमटल्या. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी असंख्य नानाप्रेमी उपस्थित होते.

नाना शंकरशेट यांनी 1838 मध्ये सर ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली. त्यामुळे शरीर विज्ञानाचे पहिले विद्यार्थी हिंदुस्थानला मिळाले. जे जे रुग्णालयाची स्थापना करताना सर जमशेदजी जिजीभॉय यांच्यासह नाना शंकरशेट यांचा सिंहाचा वाटा होता. नानांचे तैलचित्र जे. जे. रुग्णालयात लागावे यासाठी नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर यांनी पाठपुरावा केला होता.

या सोहळय़ास अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठाr डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. रणजित माणकेश्वर, डॉ. छाया वळवी, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. संजय सुरासे, डॉ. रेवत, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, मुंबई महापालिकेचे निवृत्त उपायुक्त उदयकुमार शिरुरकर, शंकरशेट कुटुंबीय, अॅड. सच्चिदानंद हाटकर, दिलीप मालंडकर, अजित पितळे, संजय पितळे, सुनील देवरुखकर व नानाप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तैलचित्रकार प्रकाश सोनवणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर यांनी केले.

नानांचे कार्य पुढच्या पिढय़ांना माहीत व्हावे यासाठी नानांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागांवर त्यांच्या पाऊलखुणा उमटवण्याचा उपक्रम याही पुढे सुरू राहील.

– अॅड. मनमोहन चोणकर

मुंबईसाठी नानांचे कार्य मोठे आहे. त्यामुळे आमच्यासारखे असंख्य डॉक्टर  आणि या देशातील जनता नानांची कायम ऋणी राहील.

– डॉ. गजानन रत्नपारखी, हृदयशल्यविशारद