ईडीने जप्त केलेली इक्बाल मिर्चीची मालमत्ता विकली! बांधकाम व्यावसायिकाला अटक; रोशन टॉकीज पाडून प्लॉट विकला

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा पंटर इक्बाल मिर्ची याची दक्षिण मुंबईतील ईडीने जप्त केलेली मालमत्ता एका व्यावसायिकाने परस्पर एका संगीतकाराच्या नातेवाईकाला अवघ्या 15 कोटींना विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत इक्बाल मिर्चीच्या मुलाने दिल्लीस्थित पीएमएलए कोर्टात धाव घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्या व्यावसायिकाला बेडय़ा ठोकल्या आहेत.

गिरगावच्या खेतवाडी येथे इक्बाल मिर्चीशी संबंधित रोशन टॉकीज ही मालमत्ता होती. ही मालमत्ता ईडीने सप्टेंबर 2024मध्ये जप्त केली होती. दरम्यान, बांधकाम व्यावसायिक असलेल्या अब्दुल कादरअली मोहम्मद वडगामा (75) याने परस्पर रोशन टॉकीज जमीनदोस्त केले व रिकामी झालेला प्लॉट त्याने एका संगीतकाराच्या नातेवाईकाला 15 कोटींना विकला. हा प्रकार कळताच ईडीने सदर जप्त मालमत्तेवरील अतिक्रमणाबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी वि.प. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून वि.प. मार्ग पोलिसांनी तपास करून अब्दुल करीमअली मोहम्मद वडगामा यांना अटक केली.

वर्ष 1982-83 साली मी आणि इक्बाल मिर्ची असे आम्ही दोघांनी मिळून ती जागा सहा लाखांत खरेदी केली होती. एका बँकेतून कर्ज काढून हे पैसे भरले होते. असा अब्दुलचा दावा आहे. मात्र याबाबत सबळ पुरावे त्याला सादर करता आलेले नाहीत. वि.. मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.