
मुंबई शहराला दहशतवाद्यांबरोबर ड्रग्ज माफिया आणि सायबर गुन्हेगारांचे मोठे आव्हान आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत. मुंबईकडे वाकडय़ा नजरेने बघणाऱ्यांना वेळीच ठेचण्यासाठी आम्ही दंड थोपाटले असल्याचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अमली पदार्थांची तस्करी, वाढत असलेले सायबर गुह्यांचे प्रमाण हे आमच्यासाठी एक आव्हान आहे. अमली पदार्थांची तस्करी, खरेदी-विक्री रोखणे आणि सायबर गुह्यांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आम्ही धडक कारवायादेखील करत आहोत. अनेक ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त करत ड्रग्ज माफियांना गजाआड धाडले आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांत मुंबई सायबर विभागाने नागरिकांचे 300 कोटी वाचवले आणि अनेक आरोपींना अटक केली असल्याचे आयुक्त भारती यांनी सांगितले.
…तर कारवाई होणार
न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईत डीजे बंदी आहे. ज्या मंडळाकडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आयुक्त भारती यांनी स्पष्ट केले.
धमकीच्या प्रत्येक कॉलची गांभीर्याने दखल
येणाऱ्या प्रत्येक धमकीच्या कॉलची गांभीर्याने दखल घेतली जाते. प्रत्येक कॉलनंतर संबंधित ठिकाणांची तपासणी केली जाते. धमकीच्या कॉल प्रकरणांमध्ये नव्वद टक्क्यांहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे भारती यांनी स्पष्ट केले.
हजारो बांगलादेशींचे प्रत्यार्पण
बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात घुसखोरी करून मुंबईत वास्तव्य करणाऱ्या जवळपास एक हजार बांगलादेशींचे प्रत्यार्पण करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.