नीतेश राणेंना मुख्य दंडाधिकाऱ्यांचा झटका, माझगाव कोर्टातील खटल्यावर स्थगितीची मागणी फेटाळली

वाचाळवीर मंत्री नितेश राणे यांना मुंबईच्या किल्ला कोर्टाने आज झटका दिला. बदनामीप्रकरणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माझगाव कोर्टात दाखल केलेल्या खटल्यावर स्थगिती देण्यात यावी अशी राणेंची विनंती मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आर. ए. शेख यांनी तूर्तास फेटाळून लावली. त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढल्या असून बदनामीप्रकरणी 13 ऑगस्ट रोजी माझगाव कोर्टात नितेश राणेंविरोधात खटला चालणार आहे.

नितेश राणे एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात बरळले होते. महाराष्ट्रात राजकीय भूपंप होणार, संजय राऊत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार, अशी बेताल बडबड नितेश राणेंनी केली होती. याप्रकरणी खासदार राऊत यांनी नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. दंडाधिकारी आरती पुलकर्णी यांच्यासमोर हा खटला सुरू असतानाच राणेंनी दंडाधिकारी बदलण्याची मागणी करत थेट किल्ला कोर्टात अर्ज केला. त्या अर्जावर आज सोमवारी मुख्य न्याय दंडाधिकारी एम.आर. ए. शेख यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राणेंच्या वकिलांनी हा खटला दुसऱ्या दंडाधिकाऱ्यांसमोर घेण्याची मागणी केली तसेच या प्रकरणावर सुनावणी पूर्ण होईपर्यंत माझगाव कोर्टातील खटल्याला स्थगिती देण्याची विनंतीही केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांची बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. मनोज पिंगळे, अ‍ॅड. त्रिश बोस यांनी ही मागणी फेटाळून लावण्याची विनंती मुख्य दंडाधिकाऱ्यांना केली. किल्ला कोर्टाने या युक्तिवादाची दखल घेत राणेंच्या विरोधातील खटल्याच्या स्थगितीची मागणी मान्य करण्यास नकार दिला व सुनावणी 26 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.