
खासगी बँक आयसीआयसीआयने खातेदारांना बचत खात्यात किमान 50 हजार रुपये ठेवण्यास सांगितले आहे. याआधी बँकेत किमान दहा हजार रुपये ठेवावे लागत होते, परंतु आयसीआयसीआय बँकेच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आयसीआयसीआय बँकेचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. बचत खात्यात किमान रक्कम किती ठेवायची हा अधिकार बँकांना आहे, ते बँकांचे स्वातंत्र्य आहे, असे संजय मल्होत्रा यांनी म्हटले आहे.
आरबीआयचा यात कोणताही सहभाग नाही. आयसीआयसीआय बँकेने नवीन बचत खात्यातील किमान शिल्लक रक्कम दहा हजार रुपयांवरून 50 हजार रुपये केली आहे. या प्रश्नाच्या उत्तरात मल्होत्रा म्हणाले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने किमान शिल्लक रक्कम ठरवण्याचे काम बँकांवर सोपवले आहे.
बँकेतील मिनिमम बँलन्स
– एचडीएफसी बँक – या बँकेतील खातेदारांना मिनिमम बॅलन्स ठेवण्यासाठी नियम आहेत. मोठय़ा शहरातील खातेदारांना किमान दहा हजार, छोटय़ा शहरातील खातेदारांना पाच हजार, तर ग्रामीण भागातील खातेदारांना दोन हजार रुपये खात्यावर ठेवावे लागतात. मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास 600 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.
– स्टेट बँक ऑफ इंडिया – एसबीआय बँकेत 2020 पासून सर्व बचत खात्यांसाठी मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही.
– पंजाब नॅशनल बँक – बँक खातेदारांना जुलै 2025 पासून किमान शिल्लक नसेल तर कोणताही दंड आकारला जात नाही.
– ऑक्सिस बँक – मोठय़ा शहरातील खातेधारकांना 12 हजार, छोटय़ा शहरातील खातेधारकांना पाच हजार रुपये, तर ग्रामीण भागात दोन हजार रुपये ठेवावे लागतात.