
भटकी कुत्री हटवा, त्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवा, अशी कडक भूमिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने घेतली. या निर्णयावर जॉन अब्राहम, जान्हवी कपूर, वरुण धवन आदी बॉलीवूड कलाकारांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. जॉन अब्राहमने सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहून आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. वरुण धवन, जान्हवी कपूर यांनीही चिंता व्यक्त केली. वरुणने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून ‘सर्व श्वानांना मृत्यूची शिक्षा ’ असे म्हटलेय. जान्हवी कपूरनेही या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ‘प्राण्यांच्या अधिकारांचे उल्लंघन’ असे म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी, एनसीआरमधील प्रशासकीय यंत्रणांना शहरातील रस्ते आणि गल्लीबोळांना भटक्या कुत्र्यांच्या जाचापासून मुक्त करण्याचे आदेश दिले. या सर्व ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्यात यावे आणि डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावे, तसेच या संस्थांनी पुढच्या आठ आठवडय़ांमध्ये पाच हजार कुत्र्यांना पकडून सुरुवात करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.