मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाला गती, महिनाअखेरीस 34 स्थानकांवर 15 डबा लोकल थांबू शकणार

मुंब्रा येथे लोकल ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामाला गती दिली आहे. महिनाखेरीपर्यंत मध्य रेल्वेच्या 34 स्थानकांवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम पूर्ण होऊ 15 डब्यांची लोकल ट्रेन थांबवणे शक्य होणार आहे.

मुंब्य्रातील दुर्घटनेनंतर लोकल ट्रेनच्या गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी विविध उपाययोजना विचारात घेण्यात आल्या. त्यात 15 डबा लोकल ट्रेनची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले असून प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जात आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण जलद मार्गावरील दोन स्थानके, ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील आठ स्थानके तसेच कल्याण ते कसारा/कर्जत/खोपोली या मार्गावरील 24 स्थानकांचा समावेश आहे.

सध्या जलद मार्गावर सीएसएमटी (प्लॅटफॉर्म 7), भायखळा (प्लॅटफॉर्म 3 व 4), दादर (प्लॅटफॉर्म 9 अ, 11 व 12), कुर्ला (प्लॅटफॉर्म 5 व 6), घाटकोपर (प्लॅटफॉर्म 3 व 4), भांडुप (प्लॅटफॉर्म 3 व 4), मुलुंड (प्लॅटफॉर्म 3 व 4), ठाणे (प्लॅटफॉर्म 5, 6, 7 व 8), डोंबिवली (प्लॅटफॉर्म 4 व 5) आणि कल्याण (प्लॅटफॉर्म 1, 1अ, 4, 5, 6 व 7) येथे 15 डब्यांच्या लोकल थांबण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गावरील सर्व स्थानके 15 डब्यांच्या लोकल ट्रेन चालवण्यासाठी सज्ज असतील. त्यामुळे प्रवासी वाहतूक क्षमतेत 25 टक्क्यांची वाढ होणार आहे. संबंधित स्थानकांमध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, दिघे, ठाकुर्ली आणि कल्याण या स्थानकांचा समावेश आहे.