
सत्तेच्या नादाला लागून जे लोक भाजपमध्ये गेले आहेत त्यांच्यावर आता कपाळाला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. कारण आता भाजपची सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे, असा जबरदस्त टोला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ‘मातोश्री’ येथे विदर्भ आणि मुंबईतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये झालेल्या मतचोरीच्या मुद्दय़ावरून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
सोमवारी झालेल्या आंदोलनाचा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. देशात जे काही सुरू आहे ते आपण पाहत आहोत. महाराष्ट्रात बेबंदशाही असल्यासारखा भ्रष्टाचार बोकाळला आहे, मात्र भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. कारण भ्रष्टाचार केल्याने सरकारमधील कुणाला काहीच फरक पडत नाही, असेही ते म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी दिल्लीला जात असताना सरकारने त्यांच्या मार्गावर खिळे रोवले. मोठे बॅरिकेड्स लावले. आता जनतेने निवडून दिलेल्या खासदारांनाही प्रश्न विचारायला दिले जात नाही. भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढूनही कोणतीही कारवाई होत नाही. हे किती दिवस सहन करायचे?
भाजपची सत्ता जाण्याच्या मार्गावर
मतांची चोरी करून हे लोक सत्तेत बसलेले असताना सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षांच्या 300 खासदारांना अटक करण्यात आली. हे खासदार निवडणूक आयोगाला मतचोरीबाबत जाब विचारणार होते, मात्र त्यांना जाऊ देण्यात आले नाही. पण आता आपल्या डोळय़ांवरून एक एक पट्टी निघत आहे. यांची नाटकं लोकांनी ओळखली आहेत, आता भाजपची सत्ता जाण्याची वेळ आलीय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नवी मुंबईतील भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचे शेकडो पदाधिकारी शिवसेनेत
नवी मुंबईतील भाजप, काँग्रेस, मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱयांनी मंगळवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजप युवा मोर्चाचे राजेश भोर, काँग्रेसचे उपाध्यक्ष नवनाथ चव्हाण, अजित पवार गटाचे डॉ. संतोष खंबाळकर, डॉ. विद्या खंबाळकर, मिंधे गटाचे स्वप्नील चव्हाण, उमेश गव्हाणे, समाजसेविका वैशाली भोर यांचे शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना नेते राजन विचारे, संपर्पप्रमुख एम. के. मढवी, जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभा प्रमुख अतुल कुळकर्णी, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सुनील गव्हाणे, सूर्यकांत मढवी, शत्रुघ्न पाटील, मनोज इसवे, शहरप्रमुख महेश कोटीवाले, विशाल ससाणे, युवासेना सहसचिव करण मढवी आदी उपस्थित होते.