
मुंबईतील आपले घर वाचवण्यासाठी संवेदनशील कवी, अभिनेते सौमित्र तथा किशोर कदम यांनी सोमवारी समाजमाध्यमातून आवाज उठवला होता. त्यांच्या या पोस्टची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून याप्रकरणी लक्ष घालण्याबाबत त्यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत.
अंधेरी चकाला येथे चरतसिंग कॉलनी रोडवर मोक्याच्या जागी हवा महल इमारतीत सौमित्र यांचा फ्लॅट आहे. या इमारतीत 24 सभासद आहेत. त्यात चक्क एसआरएखाली इमारतीचा पुनर्विकासाचा घाट घातला जात असल्याचा आरोप सौमित्र यांनी सोमवारी समाजमाध्यमात केला होता. ‘प्रकल्प सल्लागार आणि विकासकाचे संगनमत असून कमिटीचे अज्ञान हेरत त्यांनी डाव साधला आहे. त्यांनी सदस्यांचे बहुमत मिळवले असून लोक स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारायला निघाले आहेत. एसआरए म्हणून इमारतीचा विकास झाला तर आमची राहती घरे संक्रमण शिबीर होण्याची भीती सौमित्र यांनी व्यक्त करत यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे,’ अशी साद सौमित्र यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घातली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी सौमित्र यांच्या या फेसबुक पोस्टच्या तक्रारीची दखल घेतली. ही तक्रार सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आहे. आपल्याशी ते संपका&त राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.