गणेशोत्सवासाठी दर्जेदार सुविधा द्या! आदित्य ठाकरे यांचे पालिकेला सक्त निर्देश

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पालिकेने मंडळांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पालिका प्रशासनाला दिले. यावेळी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक, पालिका अधिकारी, पोलीस, वाहतूक विभाग, अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी आज जी/दक्षिण पालिका वॉर्डमध्ये पालिका अधिकाऱयांसोबत बैठक घेऊन गणेशोत्सवाबाबत मंडळे आणि भाविकांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. गणेशोत्सवात मंडळांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करा, अशा सूचना यावेळी पालिका प्रशासनाला दिल्या. पोलिसांनी डीजे बंदीबाबत आपण पोलीस आयुक्तांना पत्र लिहून डीजेची नेमकी संकल्पना काय, हे विचारणार असल्याचे ते म्हणाले.

ते चंद्रावरही निवडणुका जिंकतील

स्वतःला सो कॉल्ड हिंदुत्ववादी गणेशोत्सवात खड्डे पडल्यास 15 हजारांचा दंड ठोठावण्याची भाषा करतात, नंतर मागे घेतात असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 2014 मध्ये भाजपनेही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. आता हेच सरकार व्हीव्हीपॅट मिळणार नाही, असे सांगत आहे. कारण त्यांनी आता असे काही रसायन काढले आहे की, ते चंद्रावरही निवडणुका घेतल्या तरी जिंकून येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

बीसीसीआय शहीद जवानांपेक्षा मोठी आहे का?

एकीकडे पाकिस्तान आपल्याला धमकी देत असताना आपले सरकार मात्र बीसीसीआयला पाकिस्तानसोबत  क्रिकेट खेळायला सांगतेय. बीसीसीआयचे अधिकारी गेल्या वर्षी पाकिस्तानी खेळाडूंसोबत पार्टी करीत होते. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले तरी आपण बांगलादेसोबत क्रिकेट खेळलो. ही बीसीसीआय आपल्या देशापेक्षा आणि आपल्या शहीद जवानांपेक्षा मोठी आहे का, असा सवाल संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.