
शालेय पोषण आहाराबाबत शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे सुधारित तरतुदी जाहीर केल्या आहेत. यात पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटण्यापूर्वी अर्धा तास आधी तो मुख्याध्यापक, शिक्षक किंवा स्वयंपाकघरातील मदतनीस यांनी खाऊन बघावा. अन्न व औषध प्रशासन विभागाने शाळांमध्ये जाऊन धान्य आणि पाणी याची तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात पोषण आहारातून विषबाधेच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नव्याने सुधारित सविस्तर आदेश काढले आहेत. यात प्रत्येक शाळांमधील स्वयंपाकघरातील सुविधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये शाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडल्यास जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोषण आहाराबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकघर मदतनीस, आरोग्य अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन यांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता तपासणं आणि २४ तास नमुने जपून ठेवणं बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची चव आधी शिक्षक, स्वयंपाकघरातील मदतनीस किंवा पालकांकडून तपासली जाईल. वापरलेलं धान्य, मसाले एक वर्ष टिकणारं असावे. अन्न हाताळण्यापूर्वी हात धुण्यासाठी साबण आणि स्वच्छ पाणी उपलब्ध असणंदेखील बंधनकारक केले आहे. खाल्ल्यानंतर उलट्या, पोटदुखी किंवा ताप यासारखी लक्षणं आढळल्यास तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधणं आवश्यक आहे. पुरवठादारांनी पुरवलेल्या धान्याची गुणवत्ता तपासणं आवश्यक आहे. जिल्हा पातळीवर दर महिन्याला धान्याचा नमुना तपासला जाईल, अन्न व औषध प्रशासन विभागाने ही तपासणी करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पुरवठेदाराकडून शाळास्तरावर तांदूळ आणि इतर धान्य माल स्वीकारताना या मालाचा दर्जा चांगला असल्याची खात्री करूनच त्याचा स्वीकार करावा. मालाचा दर्जा निकृष्ट असल्यास हा माल बदलून देण्याबाबत संबंधित पुरवठादारांना सांगावे. पोषण आहारासाठी धान्याची साठवणूक करण्यात येणारी जागा जमिनीपासून उंचीवर असल्याची खात्री करावी. जेणेकरून ओलावा आणि अन्य बाह्य घटकांपासून धान्याचं रक्षण होईल. स्वयंपाकगृह परिसरात किडे, झुरळे, उंदीर, घुशी, साप, मांजर यांचा वावर असणार नाही, यासाठी उपाययोजना करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
…अन्यथा दंडात्मक करावाई करावी
पोषण आहारासाठी धान्य पुरवणाऱ्या पुरवठादाराच्या गोदामांची भारतीय अन्न महामंडळामार्फत वेळोवेळी तपासणी करावी. त्या गोदामातील तांदळाचे तीन नमुने संकलित करावे, अशा सूचना संबंधित शिक्षणाधिकारी, भारतीय अन्न महामंडळ आणि पुरवठा विभागाच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत. गोदाम अस्वच्छ आढळून आल्यास संबंधित पुरवठेदाराला समज देऊन ५० हजार रुपये दंडाची कारवाई करावी. दुसऱ्या तपासणीवेळी गोदाम अस्वच्छ आढळून आल्यास ठेकेदाराला १ लाख रुपयांच्या दंडात्मक कारवाईची सूचना शासन निर्णयात देण्यात आली आहे.