
राजस्थानमधील दौसा येथे एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. खाटूश्याम मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार पिकअप ट्रकला धडकली आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 7 मुले आणि 3 महिलांचा समावेश आहे. बापीजवळ प्रवासी पिकअप आणि ट्रेलर ट्रक यांच्यातील अपघातात मृतांची एकूण संख्या आता 11 झाली आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
खाटूश्यामजी मंदिराचे दर्शन घेऊन भाविक घरी परतत असताना हा अपघात झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कार पार्क केलेल्या ट्रकला धडकली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यानंतर अधिक माहिती कळेल, असे पोलिसांनी सांगितले. अपघाताची पुष्टी करताना पोलिस अधीक्षक सागर राणा म्हणाले, खाटूश्याम मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुमारे 7-8 जणांना जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दौसा येथे कार आणि ट्रेलरच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच हा अपघात घडला. ट्रेलर अचानक दोन भागांमध्ये विभागला गेला आणि कारला धडकला, ज्यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिघांचा मृत्यू झाला. जखमी जयपूरहून स्पर्धा परीक्षा देऊन त्यांच्या गावी परतत होते.