माझे खरे वय 35 वर्षे, 124 वय दाखवणे ही निवडणूक आयोगाची चूक; मिंता देवी निवडणूक आयोगावर संतापल्या

बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदारयादी पुनर्निरीक्षण आणि मतदार यादीतील गोंधळ, मतचोरी या विरोधात इंडिया आघाडीने नवी दिल्लीत मोर्चा काढला होता. या मोर्चात निवडूक आयोगाने 124 वयाच्या महिला मतदार मिंता देवी यांची नोंद केली होती. हा मुद्दा या मोर्चातून चर्चेला आला. तसेत 124 वर्षांच्या मतदार मिंता देवी नेमक्या कोण,याबाबतच्या चर्चाही सुरू होत्या. आता मिंता देवी यांनी आपल्या वयाबाबातची माहिती देत निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला आहे.

मतदार ओळखपत्रात माझे वय 124 वर्ष नमूद केल्यामुळे मिंता देवी चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. आपले वय 35 वर्ष असून मतदारयादीत ते 124 वर्षे नोंदले गेले, ही कारकुनी चूक असल्याने त्यांनी सांगितले. आपले जन्मवर्ष 1990 ऐवजी 1900 असे चुकीचे नोंदवले गेले, त्यामुळे आपले वय 124 वर्षे दाखवले गेले असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या या चुकीमुळे आपल्या प्रतिमेचा राजकीय वापर होत असल्याने त्यांनी आयोगाच्या चुकावर संताप व्यक्त केला.

ही निवडणूक आयोगाची चूक आहे. मी माझी कागदपत्रे ऑनलाइन सादर केली होती. मात्र, त्यांनी जन्मवर्ष नोंदवण्यात मोठी चूक केली आणि माझे वय 124 वर्षे दाखवले. त्यामुळे आता प्रत्येकजण माझ्या वयाबद्दल विचारत आहे. हा वाद सुरू होईपर्यंत आपल्याला मतदार ओळखपत्रात चुकीचे जन्मवर्ष 15-07-1900 लक्षात आले नाही. सिवानचे जिल्हाधिकाऱ्या आदित्य प्रकाश यांनी ही कारकुनी त्रुटी असल्याचे मान्य केले. या चुकीसाठी त्यांनी संगणक ऑपरेटरला दोषी ठरवले आहे. तसेच या चुकीची आठवड्याभरात दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. उपनिवडणूक अधिकारी सोहेल अहमद यांनी सांगितले की, मिंता यांनी दुरुस्तीसाठी अर्ज केला होता.

निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीमध्ये झालेल्या अशाच चुका आता निदर्शनास येत आहेत. बिहारच्या सिवानमधील दरौंधा येथील महिला मतदाराने आणखी एक विचित्र डेटा-एंट्री त्रुटी निदर्शनास आणून दिली. त्यांचे पती धनंजय कुमार सिंग यांचे नाव त्यांच्या घर क्रमांकमध्ये नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बिहारच्या मतदार यादीत SIR ने अधिकृत माहितीच्या आधारे आणखी दोन शंभरी उलटलेल्या मतदारांची नोंद आहे. भागलपूरच्या पीरपैंती येथील आशा देवी आणि गोपाळगंजच्या बरौली मतदारसंघातील मंटुरिया देवी यांचे वय 100 वर्षांच्या पुढे आहे. भागलपूरच्या उपनिवडणूक अधिकाऱ्यांनी आशा देवी यांच्या वयाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर, नियुक्त बीएलओ फरजाना खातून यांनी त्या ठिकाणी भेट दिली, त्यांचे आधार कार्ड तपासले आणि गावकऱ्यांशी बोलून त्या 120 वर्षांच्या आहेत याची पुष्टी केली, असे अधिकृत अहवालात म्हटले आहे. बरौलीच्या सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी मंगळवारी दाखल केलेल्या अहवालानुसार, प्रत्यक्ष पडताळणीनंतर मंटुरिया देवी यांचे वय 119 वर्षे हेदेखील योग्य असल्याचे आढळले आहे.