
जमिनीच्या जुन्या वादातून एका दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना औसा-तुळजापूर मार्गावरील करजखेडा पाटी येथे बुधवारी (13 ऑगस्ट 2025) दुपारी घडली. सहदेव व प्रियंका पवार असे मृत दाम्पत्याचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहदेव व प्रियंका पवार हे धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथील रहिवाशी आहेत. मागील काही दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून सहदेव पवार यांनी जीवन चव्हाण यांना मारहाण केली होती. या प्रकरणात सहदेव पवार यांना न्यायालयाने चार वर्षाची शिक्षा सुनावली होती. सहदेव पवार हे मागील काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटून गावी आले होते.
बुधवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास सहदेव पवार व पत्नी प्रियंका पवार हे गावातून चौकाकडे येत असताना आरोपी जीवन चव्हाण, हरिबा चव्हाण हे बाप-लेक चौकाकडून गावाकडे जात होते. यावेळी चव्हाण बाप-लेकांनी मागील भांडणाचा बदला घेण्यासाठी समोरुन येणार्या पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी पवार पती-पत्नी खाली पडताच चव्हाण बाप-लेकांनी सहदेव पवार व प्रियंका पवार यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियंका पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर सहदेव पवार यांचा उपचारासाठी घेवून जात असताना वाटेत मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेतील मृत पवार दाम्पत्याना दोन लहान मुली असून एक मुलगी पहिलीमध्ये तर दुसरी मुलगी तिसरीमध्ये शिकत आहे. या घटनेमुळे दोन लहान मुलींच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. मृत पवार यांच्या पश्चात आई-वडील, दोन लहान मुली असा परिवार आहे.