जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात उठाव होऊ द्या! भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध दुसरा स्वातंत्र्यलढा लढावा लागेल! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

‘देशात सध्या भयंकर स्थिती आहे. भाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असून देश गुलामगिरीकडे चालला आहे. अशा परिस्थितीत देशाचे स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर हुकूमशाहीविरुद्ध दुसऱया स्वातंत्र्य लढय़ाची गरज आहे, असे सांगतानाच, जनसुरक्षा कायदा सर्वसामान्यांसाठी किती वाईट आहे ते पटवून द्या. त्या विरोधात उठाव होऊ द्या,’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.

घटनाविरोधी, जनविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समितीने यशवंतराव चव्हाण केंद्रात राज्यव्यापी परिषद भरवली होती. त्या परिषदेत उद्धव ठाकरे यांनी कायद्याच्या विरोधात ठाम भूमिका मांडली.

देशद्रोह विरोधी कायदा म्हणा, आम्ही पाठिंबा देतो!

संविधानात धर्मनिरपेक्षता, समान वागणूक असा उल्लेख आहे, डावे-उजवे असा भेद नाही, पण जनसुरक्षा कायद्यात तो करण्यात आला आहे. तो आम्हाला मान्य नाही. हा कायदा देशद्रोहीविरोधी आहे असे सरळ म्हणाल तर शिवसेनेचा या कायद्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता डावे-उजवे करून उपयोग नाही. हा कायदा सर्वसामान्यांसाठी किती वाईट आहे, त्याचा कसा दुरुपयोग केला जाऊ शकतो हे पटवून दिल्याशिवाय जनसामान्यांमधून त्याविरुद्ध उठाव होणार नाही. ते करावे लागले आणि त्यासाठी शिवसेना सदैव समविचारी पक्षांसोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या रखडलेल्या निकालाचाही उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला. घटनेत संविधानात परिशिष्ट 10 आहे की नाही? समोर दिसत असूनही केवळ ‘तारीख पे तारीख’ सुनावणी सुरू आहे, बतावणी कधी होणार? असा सवाल त्यांनी केला. दिल्लीतील भटक्या कुत्र्यांची दखल न्यायालयाने घेतली. पण आमचे पक्ष दिवसाढवळ्या फोडले गेले त्यावर निकाल दिलेला नाही. हा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मंत्र्यांच्या घरी पैशाच्या बॅगा दिसल्या तरी अटक का नाही?

रोकड सापडली म्हणून वसईच्या माजी महापालिका आयुक्तांना अटक झाली. मग मंत्र्यांच्या घरी पैशाच्या बॅगा दिसल्या तरी त्यांना का अटक नाही? त्याला समज देऊन सोडून देतात. पुढच्या वेळी अशी बॅग उघडी टाकत जाऊ नको, बंद ठेवत जा, असा मिश्किल टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. या परिषदेला खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल देसाई, आमदार विनोद निकोले, उल्का महाजन, किसान सभेचे अजित नवले, भारत पाटणकर, प्रकाश रेड्डी, , भालचंद्र कानगो, उदय भट, कॉ. प्रकाश रेड्डी, राजेंद्र कोरडे आदी उपस्थित होते.

भाजपवाल्यांचा जन्म नेहरूंच्या काळात, त्यात नेहरूंचा दोष काय?

‘राजकारणात मनभिन्नता असू शकते. शिवसेनेचा डाव्या पक्षांबरोबरही पराकोटीचा संघर्ष झाला आहे. नंतर कळले की उगीचच भांडत होतो. आता एकत्र येतोय कारण आमच्यामध्ये देशप्रेम हा धागा आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी या वेळी भाजपवरही हल्ला चढवला. भाजपची मानसिकता सडलेली आहे आणि शिवसेना सडलेल्या मानसिकतेच्या विरोधात आहे. शिवसेनेने भाजपसोबत 25 ते 30 वर्षे वाया घालवली. भाजप आयत्या बिळावरचा नागोबा आहे आणि लोकांकडून दूध पाजण्याची अपेक्षा ठेवतो. भाजपने देशाला कोणतेही विचार किंवा आदर्श दिले नाहीत, म्हणून ते दुसऱयांचे आदर्श चोरतात. वाईट झाले की नेहरूंचे नाव घेतात. सगळे नेहरूंनी केले. भाजपवाल्यांचा जन्मही नेहरूंच्या काळात झाला, मग त्यात नेहरूंचा काय दोष, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला. महात्मा गांधी असोत किंवा इतर कुणी नेहरूंना पंतप्रधान करून चूकच केली. वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज संघ दिसलाच नसता, असे ते म्हणाले.

न्यायसंस्थेत घुसखोरी करणाऱया सरकारला जागा दाखवा – शरद पवार

भाजपच्या सत्ताकाळात लोकशाही मूल्यावर संकट आले आहे. सार्वजनिक संस्थांवर हल्ला सुरू आहे. न्यायसंस्थेतही घुसखोरी झाली आहे. राजकीय पक्षाचे काम केलेल्या व्यक्तीला न्यायाधीशपदी नेमण्यात आले आहे. या सरकारला आता जागा दाखवण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या वेळी म्हणाले. जनसुरक्षा कायद्याने विचार व मूलभूत अधिकारावर हल्ला केला आहे. या कायद्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने सोबत राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

पंतप्रधान पदावर नजर ठेवून फडणवीसांनी कायदा आणला – हर्षवर्धन सपकाळ

‘जनसुरक्षा कायदा हा लोकशाही असुरक्षा कायदा असून आरएसएसचे दिवंगत सरसंघचालक गोळवलकर यांना अभिप्रेत असलेला हिंदुस्थान घडवण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. देवेंद्र फडणवीस यांना दिवसाढवळ्या पंतप्रधान पदाची स्वप्नं पडायला लागली आहेत. त्यामुळेच त्यांनी हा कायदा आणला, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काँग्रेसचा या कायद्याला तीव्र विरोध आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही या कायद्याची होळी केली, मशाल यात्रा काढली आहे. यापुढेही या कायद्याला विरोधच राहील, असे सपकाळ म्हणाले.

चीनमध्ये सरकारविरोधात बोललं की तो माणूस दोन दिवसांत अदृश्य होतो. चीनमध्ये सर्व डावे आहेत, मग पंतप्रधान तिकडे का जातायत? ते कडवे डावे नाहीत का? अजित डोवाल रशियाला जातात, तिथं कोण आहेत? तिथंही डावेच आहेत ना? – उद्धव ठाकरे