
महायुतीच्या नेत्यांनी सत्तेवर येण्यापूर्वी निवडणुकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता अद्यापि झालेली नाही. त्याऐवजी 86 हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग करून शासन जनतेची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे ‘शक्तिपीठ महामार्ग नको; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या. जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील’, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिह्याचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘शेतकरी कर्जमुक्ती दिंडी’ची श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे सांगता झाली, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते संजय पवार हे होते. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव उगळे, सहसंपर्कप्रमुख राजू समंजी, राज्य संघटक चंगेजखान पठाण, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, महिला जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, तालुका संघटक राजू पाटील यांच्यासह मोठय़ा संख्येने शेतकरी, शिवसैनिक उपस्थित होते.
विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. यासाठी आंदोलनाचा लढा उभारला जात आहे. शक्तिपीठ महामार्गाऐवजी शेतकरी कर्जमुक्ती महत्त्वाची आहे. 2019ला मुख्यमंत्री असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
संजय पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘शेतकरी कर्जमुक्ती’ दिंडीचे आयोजन केले होते. त्याची सुरुवात कोल्हापूर जिह्यातील चंदगड येथून झाली होती. त्याची सांगता नृसिंहवाडी येथे आज झाली. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रभर या दिंडीतून प्रबोधन करण्यात येणार आहे.
इचलकरंजी शहरप्रमुख सयाजी चव्हाण, युवासेना जिल्हा युवाअधिकारी शिवाजी पाटील, दयानंद मालवेकर, प्रतीक धनवडे, युवासेना तालुका युवा अधिकारी नीलेश तवंदकर, मिलिंद गोरे, महिला आघाडीच्या राजश्री मालवेकर, भगतसिंग शिलेदार आदी उपस्थित होते. संजय आणुसे यांनी प्रास्ताविक केले. बाळसिंग राजपूत यांनी आभार मानले.
श्री दत्तचरणी साकडे
शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘शेतकरी कर्जमुक्ती दिंडी’ची सांगता श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे झाली. यावेळी ‘शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी महायुती सरकारला द्यावी’, असे साकडे शिवसैनिकांनी श्री दत्तचरणी घातले.