
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज चौथ्या दिवसापासून भाविकांसाठी पूर्ववत खुले करण्यात आले. या तीन दिवसांच्या संवर्धन प्रक्रियेत केंद्रीय पुरातत्वच्या पथकाने नेमके काय काम केले, याबाबत या पथकासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडूनही रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
आज दुपारी बारानंतर देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते; पण प्रत्यक्षात तीन तासांपूर्वीच दर्शन पूर्ववत खुले करण्यात आले. केंद्रीय पथकाकडून देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे अहवाल दिल्याचे सांगितले जात असले, तरी पूर्वीप्रमाणेच हासुद्धा अहवाल पुन्हा एकदा गुलदस्त्यात राहिल्याने भाविकांसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
श्री अंबाबाईच्या मूर्तीवरील अभिषेक तसेच इतर अन्य कारणांमुळे झालेल्या झिजेच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच रासायनिक संवर्धन करण्यात आले आहे. कित्येक वर्षांपासून मूर्तीवरील अभिषेक बंद करूनसुद्धा वारंवार संवर्धन प्रक्रिया करावी लागली. या प्रक्रियेत देवीच्या मस्तकावरील नागाचे शिल्प गायब झाल्याचा वाद निर्माण झाला होता.त्यानंतरही मूर्तीवरील पांढरे डाग चिंतेचा विषय बनला होता. धार्मिक धर्मशास्त्राप्रमाणे नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचीही मागणी होत होती; पण देवस्थान समितीकडून यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही. सन 2015 मध्ये मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. त्याचा अहवाल आजपर्यंत भाविकांसमोर आला नाही. गेल्या वर्षी नवरात्रोत्सवाच्या काही दिवस अगोदर अचानक रातोरात संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. त्याचाही अहवाल समोर आला नाही. आता पुन्हा नुकतीच 11 आणि 12 रोजी पुरातत्व खात्याच्या पथकाकडून देवीच्या मूळ मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात आली.त्यामुळे दोन दिवस भाविकांसाठी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद करण्यात आले होते. गर्भगृहातील स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीही मूर्तीचे दर्शन बंद होते.
नेहमीप्रमाणे देवीच्या मूळ मूर्तीवर नेमकी संवर्धन प्रक्रिया काय केली आणि पुढे काय करावे लागेल, या संदर्भात माहिती न देता, केंद्रीय पुरातत्व खात्याचे पथक निघून गेले. जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल एडगे यांच्यासह सचिव शिवराज नायकवडी यांच्याकडूनसुद्धा रात्री उशिरापर्यंत कसलीही माहिती देण्यात आली नव्हती.