शेअर बाजाराला अच्छे दिन; टॅरिफच्या धक्क्याने घसरलेल्या सेन्सेक्स, निफ्टीने घेतली मोठी उसळी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धक्क्याने गेल्या महिन्याभरापासून शेअर बाजार घसरत होता. मात्र, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स, निफ्टीने मोठी उसळी घेतली आहे. बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्सने 1100 अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी 350 अकांची वाढ नोंदवत 25000 टप्प्याजवळ पोहचला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजार वादळी तेजीसह उघडला आणि सेन्सेक्सने सुरुवातीच्या काही मिनिटांतच 1100 अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी 25000 अकांवर पोहोचला.

सोमवारी शेअर बाजारात जीएसटी बदलांबाबत केंद्र सरकारने केलेली घोषणा स्पष्टपणे दिसून आली आणि सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात जबरदस्त तेजीने झाली. सेन्सेक्सप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही तेजी दाखवत 350 अंकांनी वाढ नोंदवत 25,000 च्या टप्प्याजवळ पोहचला. सुरुवातीच्या व्यवहारात मारुती, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या बँकिंग समभागांमध्ये जोरदार वाढ दिसून आली.

सोमवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच, दोन्ही निर्देशांक रॉकेटसारखे धावू लागले. बीएसईचा सेन्सेक्स 81,315 वर उघडला, जो त्याच्या मागील बंद 80,597.66 पेक्षा जास्त होता आणि नंतर काही मिनिटांतच अचानक 1100 पेक्षा जास्त अंकांनी वाढला आणि 81,713.30 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. त्याच वेळी, एनएसईचा निफ्टी-50 देखील त्याच्या मागील बंद 24,631.30 वरून 24,938.20 वर उघडला आणि काही वेळातच, सेन्सेक्सच्या बरोबरीने चालत तो 350 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह 25,000.80च्या पातळीवर पोहोचला.

मारुती शेअर (७.२७%), बजाज फायनान्स शेअर (६%), बजाज फिनसर्व्ह शेअर (४.६६%), एम अँड एम शेअर (४.५८%), ट्रेंट शेअर (३.८२%), एचयूएल शेअर (३.३६%), टाटा मोटर्स शेअर (२.४०%) यासारख्या लार्ज कॅप कंपन्यांचे शेअर्स तेजीने व्यवहार करत होते. याशिवाय बँकिंगच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. अ‍ॅक्सिस बँक शेअर (१.८०%), कोटक बँक (१.७५%), आयसीआयसीआय बँक (१.७०%), एचडीएफसी बँक (१.५०%) तेजीने व्यवहार करत होते. त्याच वेळी, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येही १.३०% वाढ झाली. टाटा स्टील, अदानी पोर्ट्समध्येही सुमारे 1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी दिसून आली.