कुत्रा चावण्याच्या नोंदी संदर्भात प्राणी कल्याण मंडळाचे आरोग्य महासंचालकांना पत्र

रस्त्यावरील कुत्रे आणि पाळीव कुत्रे चावण्यासंदर्भातली घटनांची स्वतंत्रपणे नोंद करण्यात यावी अशी मागणी आता भारतीय प्राणी कल्याण मंडळाने पत्राद्वारे केली आहे. भारतीय प्राणी कल्याण मंडळाने (AWBI) यासाठी आरोग्य महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या संदर्भात मंडळाने पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जून २०२३ मध्ये देखील हा मुद्दा उपस्थित करणारे पत्र लिहिले होते. असे असूनही कुत्रा चावण्याच्या घटनांची अजूनही स्वतंत्रपणे नोंदवली जात नाहीत.

AWBI च्या वतीने, पशुसंवर्धन आयुक्त अभिजित मित्रा यांनी आरोग्य सेवा महासंचालकांना पत्र लिहिले आहे. पत्रात आरोग्य महासंचालकांना अशी मागणी करण्यात आली आहे की, सर्व वैद्यकीय संस्थांना कुत्रा चावल्याची प्रकरणे स्वतंत्रपणे नोंदवण्याचे निर्देश द्यावेत. एखाद्याला रस्त्यावरील कुत्रा चावला असेल तर त्याची स्वतंत्रपणे नोंद करावी. याशिवाय एखाद्याला  पाळीव कुत्रा चावला असेल तर त्याची स्वतंत्रपणे नोंद करावी.

कुत्रा चावण्याच्या प्रकरणांची नोंद स्वतंत्रपणे नोंदवली जात नसल्याने,  कुत्रा चावण्याच्या घटनांना केवळ रस्त्यावरील कुत्र्यांना जबाबदार धरले जात आहे. २०१८ ते २०२३ च्या दरम्यान, दिल्लीत १.२७ लाखांहून अधिक कुत्रा चावण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. तर मुंबईत २०१८-२०२२ दरम्यान ३.५३ लाख प्रकरणे नोंदवली गेली. यातील काही प्रकरणे पाळीव कुत्र्यांशी संबंधित आहेत, परंतु अशा प्रकरणांमध्ये स्पष्ट श्रेणी नसल्यामुळे सर्व प्रकरणे रस्त्यावरील कुत्र्यांच्या चावण्याच्या नोंदी म्हणून नोंदवली जातात.

कुत्रा चावण्याच्या घटनांची नोंद योग्यपद्धतीने ठेवण्यामुळे पाळीव आणि रस्त्यावरील कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांची नोंद वेगळी असेल. यामुळे संपूर्ण देशात लसीकरण आणि जागरूकता कार्यक्रम राबविण्यास मदत होईल. तसेच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आकडे बाहेर येतील तेव्हा पाळीव कुत्रा चावण्याच्या घटना किती तसेच रस्त्यावरील कुत्रे चावण्याच्या घटना किती आहेत हे सहजस्पष्ट होईल. यामुळे पाळीव कुत्र्यांच्या मालकांची जबाबदारी अधिक वाढेल.