
मुंबईत गेल्या तीन दिवसांत महिनाभराचा म्हणजे 300 मिमिपर्यंत पाऊस झाल्याने पालिकेच्या यंत्रणेवर ताण आल्याने मुंबईच्या अनेक भागांत पाणी तुंबल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. शिवाय कमी क्षमतेच्या पर्जन्य जलवाहिन्यांमुळेही पाणी तुंबले, मात्र तुंबलेले पाणी उपसण्यासाठी तब्बल 525 पंप लावल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.
16 ऑगस्ट रोजी सकाळपासून पालिका क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून ते 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या साधारणपणे चार दिवसांच्या कालावधीत सर्व उदंचन केंद्रामधून तब्बल 16,451.55 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा उपसा करण्यात आला. तुलनात्मक विचार केल्यास 8,04.6 कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱया तुळशी तलावातील पाण्याच्या दुपटीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा गेल्या 4 दिवसांत करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले.