
न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना बांबू व ताडपत्री बांधून बंद केला होता. मात्र त्याविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून तेथे धुडगूस घालण्यात आला होता. काही महिलांनी चापूने ताडपत्री फाडून बांबू उचकटून टाकले होते. याप्रकरणी 150 जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कबुतरखान्यात कबुतरांना खाद्य टापू नये असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या आदेशानुसार पालिकेने पोलीस बंदोबस्तात दादर येथील कबुतरखाना बांबू व ताडपत्री बांधून बंद केला होता. असे असतानाही 6 ऑगस्टच्या सकाळी काही पक्षीप्रेमी व जैन समुदायाच्या लोकांनी कबुतरखाना येथे विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत थेट कबुतरखान्यावर हल्ला चढवला होता. संतप्त महिला आंदोलकांनी बंदोबस्तासाठी तैनात महिला अंमलदारांना धक्काबुक्की करत चाकूने ताडपत्री फाडल्या. शिवाय रस्सी कापून बांबू उखडून टाकले होते.
n जवळपास दीडशे आंदोलकांवर विनापरवाना आंदोलन, निदर्शने करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, कायदा व सुव्यवस्था बिघडवणे, आंदोलनात चाकूचा वापर करणे आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दादर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. आता कोणाला व किती जणांवर अटकेची कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.