
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुदर्शन रेड्डी यांच्या समर्थनार्थ आज इंडिया आघाडीचा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या लढाईत ज्यांच्याकडे सुदर्शन चक्र आहे त्यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला. ”महाभारतात पांडवांची ताकद कमी होती पण पांडव जिंकले, कारण त्यांच्याकडे सुदर्शन चक्र होतं, आज ते आमच्याकडे आहे“, असे संजय राऊत म्हणाले.
”आज एका ऐतिहासिक लढाईची सुरुवात सेंट्रल हॉलमधून केली. ही लढाई फक्त प्रतिकात्मक नाही तर ही लढाई न्याय, सत्य व संविधानाचे रक्षण करण्याची लढाई आहे. ही लढाई जिंकायची जबाबदारी आपल्यावर आहे. मी इतकंच सांगेन की देशात परिवर्तनाचे वादळ आले आहे. हे वादळ बिहारमधून सुरू होऊन दिल्लीला पोहोचली आहे. राहुल गांधींना मी धन्यवाद देतोय बिहार वरून जी सुरुवात करून आपण आपली ताकद वाढवली आहे. शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या लढाईला राष्ट्रपती पदाची लढाई नाही तर ही देशाची लढाई असून त्याला आम्ही पूर्ण समर्थन दिले आहे. आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे आकडे नाहीत पण ज्यांच्याकडे सुदर्शन आहे त्यांचाच विजय निश्चित आहे. महाभारतात पांडव कौरवांची लढाई झाली. त्यात पांडवांची ताकद कमी होती. पण पांडव जिंकले. कारण त्यांच्याकडे सुदर्शन चक्र होतं. आज सुदर्शन आमच्याकडे आहे. फक्त आम्हाला लढायचे जिगर हवे. आम्ही लढणार आम्ही जिंकणार. देशासाठी, लोकशाहीसाठी, सत्यासाठी, संविधानासाठी, न्यायासाठी एका मनाने ही लढाई जिंकणार. संसदेच्या दोन्ही सभागृहात जी लोकशाहीची हत्या होतेय त्याला वाचवायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू”, असे संजय राऊत म्हणाले.