
मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपले असताना आता पावसाळी आजारांचा ‘ताप’ही वाढला आहे. यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 404 झाली असून मलेरियाचे 674 रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या वाढतच असून पालिका रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये येणाऱया रुग्णांची संख्या 35 टक्क्यांनी वाढली आहे. या रुग्णांमध्ये निम्मी संख्या लहान मुलांची असल्याने मुंबईचे टेन्शन वाढले आहे.
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढत आहे. पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, जाँडीस असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे आजार पसरतात. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते. कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्रफवारणी मोहीम व्यापकपणे राबवण्यात येते. तरीदेखील सततच्या पावसामुळे आणि अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावत असल्याचे समोर येत आहे.
दोन आठवड्यांमधील रुग्ण
मलेरिया – 674, डेंग्यू – 404, लेप्टो – 72, गॅस्ट्रो – 328, कावीळ – 90, चिकुनगुनिया – 63, कोरोना – 15
पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. कोणतीही लक्षणे दिसल्यास रुग्णालयात संपर्क साधावा. z डॉ. मोहन जोशी, डीन, शीव रुग्णालय
- पालिकेने दोन आठवडय़ांमध्ये पाच लाख घरांचे सर्वेक्षण केले. त्यात मलेरिया डासांची 1954 आणि डेंग्यूची 9890 उत्पत्ती स्थाने नष्ट केली.