दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला; धक्काबुक्की, कानाखाली मारली, केस ओढले

दिल्लीतील भाजप सरकारच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज हल्ला झाला. जनता दरबारात लोकांशी संवाद साधत असताना राजेश खिमजीने हा हल्ला केला. त्याने रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारली. त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांचे केसही ओढले. हल्ल्यात गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी राजेश खिमजीभाई साकरिया (वय 41) हा रिक्षा चालक आहे.  त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. याआधीही तो दिल्लीत आला होता. शंकराचा भक्त असलेला राजेश हा अधूनमधून उज्जैनला जात असे. या वेळीही उज्जैनला जातो असे घरात सांगून तो दिल्लीत पोहोचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. राजेश हा राजकोटचा असल्याचे समजताच तेथील पोलिसांनी त्याची आई भानूबेन हिला चौकशीसाठी बोलावले. तिच्या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा झाला.

हल्ल्याआधी केली होती रेकी

हल्ला करण्याच्या एक दिवस आधी मंगळवारी राजेश खिमजी याने गुप्ता यांच्या शालिमार बाग निवासस्थानाची रेकी केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून ही माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री सुरक्षित नाहीत, सामान्यांचे काय?

या घटनेचा निषेध करताना काँग्रेसने दिल्लीच्या कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवले आहे. ‘‘घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण दिल्लीच्या मुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील तर सामान्य दिल्लीकर सुरक्षित कसे असू शकतात,’’ असा सवाल काँग्रेसने केला आहे.

भटक्या कुत्र्यांवरील कारवाईचा राग, हल्लेखोर गुजरातचा

आरोपी राजेश खिमजी हा  मूळचा गुजरातमधील राजकोटचा असून श्वानप्रेमी आहे. शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून भाकऱया जमा करून तो भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायचा. भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे तो निराश झाला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्लीच्या रस्त्यावरून कुत्र्यांना उचलले जात असल्याचा व्हिडिओ पाहून तो संतापला होता. कुत्र्यांसोबत हे लोक असे का वागताहेत असे तो घरी बोलायचा. हाच राग त्याने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर काढल्याचे समजते.