अय्यरवर अन्याय झालाय! आशिया कप संघातून वगळल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या पाठीशी

आयपीएलमध्ये 604 धावा, आपल्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचवले, रणजी ट्रॉफीतही चांगली कामगिरी, चॅम्पियन्स ट्रॉफीतही जबरदस्त फलंदाजी, तरीही आशिया संघात श्रेयस अय्यरला स्थान न मिळणे हा प्रकार क्रिकेट विश्वालाच नव्हे तर दिग्गज क्रिकेटपटूंच्याही पचनी पडत नाहीय. अय्यरला डावलणे हा त्याच्यावर एकप्रकारचा अन्यायच झाल्याची भावना क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्यामुळे आशिया कपमध्ये अय्यरला वगळणार्या निवड समितीला टीकेला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र उभे राहिले आहे.

श्रेयसला वगळल्यानंतर माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांनी श्रेयस-यशस्वीला मैदानावर आणखी काय करायला हवे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच आकाश चोप्रानेही अय्यरला पाठिंबा दर्शवत त्याला 15 सदस्यीय संघात स्थान देता आले नाही. किमान पाच राखीव खेळाडूंमध्ये तरी त्याची निवड करायला हवी होती. जो फलंदाज आयपीएल गाजवतो, राष्ट्रीय स्पर्धेत धावांचा धडाका कायम राखतो, चॅम्पियन्स ट्रॉफीतही आपल्या फलंदाजीची कमाल दाखवतो त्या श्रेयसला संघात स्थान मिळवण्यासाठी एका खेळाडूने आणखी काय सिद्ध करायला हवे? अय्यरवर अन्याय झालाय, पण मला पूर्ण विश्वास आहे की, तो हिंदुस्थानच्या टी-20 विश्वचषक संघाचा नक्कीच असेल.

चोप्राप्रमाणे अभिषेक नायरलाही अय्यरला वगळणे खटकले होते. त्यानेही निवड समितीच्या निवडीला आश्चर्यकारक म्हटले होते. मंगळवारी अश्विननेही दुःखद आणि अन्यायकारक अशा शब्दांत आपला संपात व्यक्त केला होता. तसेच अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी श्रेयस आणि जैसवालला वगळल्याबद्दल आपल्या तीव्र भावना व्यक्त करत निवड समितीवर जोरदार टीका केली आहे.

हर्षित आला कुठून ?

आशिया कपसाठी वैभव सूर्यवंशीला निवडावे अशी मागणी करणाऱया कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी हर्षित राणा आणि शिवम दुबेच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. ‘आयपीएलमध्ये सामान्य गोलंदाजी करणारा हर्षित राणा आला कुठून ? त्याने आयपीएलमध्ये काय केलं? त्याचा इकॉनॉमी रेट 10 होता. मग प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजला काय संदेश देता तुम्ही?’ असा संताप व्यक्त करत निवड समितीला धारेवर धरले.

आयपीएलमध्ये प्रसिद्ध कृष्णाने ‘पर्पल कॅप’ पटकावली आणि सिराजनेही तुफान गोलंदाजी केली होती . तरीही या दोघांकडे पाठ फिरवून हर्षितला संघात घेतले गेले. या निवडीला वास येतोय. सारंकाही कुणीतरी मॅनेज करतोय, असा संशय येऊ लागलाय. तसेच शिवम दुबे कसा संघात बसला. तो आठव्या नंबरवर काय कामाचा? त्याच्याकडून ना नीट गोलंदाजी होणार, ना तो खरा अष्टपैलू आहे. त्याच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर हा योग्य पर्याय होता, पण निवडकर्त्यांनी डोळय़ावर पट्टी बांधली आहे.