अनंत जीतसिंह नरुकाला सुवर्णपदक, हिंदुस्थान तिसऱ्या दिवशी 3 सुवर्ण, 2 कांस्यांसह पदकतालिकेत अव्वल

ऑलिम्पियन अनंत जीतसिंह नरुका याने 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या स्कीट प्रकारात आपले स्वप्न पूर्ण केले. गतवर्षीच्या रौप्यपदकाचे त्याने यंदा सुवर्णपदकात रूपांतर करत माजी आशियाई विजेता कुवेतच्या मन्सूर अल राशिदीवर 57-56 असा थरारक विजय मिळविला. हिंदुस्थानने तिसऱया दिवसअखेर पदकतक्त्यात अव्वल स्थान कायम ठेवले. हिंदुस्थानकडे आता एकूण 19 पदके असून त्यात 9 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्यपदकांचा समावेश आहे.

दोन दिवसांच्या पात्रता फेरीत 119 गुणांसह तिसऱया क्रमांकावर राहिल्यानंतरही नरुकाने अंतिम फेरीत आत्मविश्वासपूर्ण नेमबाजी केली. 60 नेमांच्या निर्णायक फेरीत पहिले 30 पैकी 29 नेम अचूक मारले. 36 पैकी 35 नेम मारत त्याने आघाडी घेतली आणि अखेरच्या 10 नेमांपूर्वी एक गुणांनी आघाडी घेतली. शेवटच्या फेरीत दोघांनी एक-एक नेम चुकवला, पण नरुकाने आघाडी कायम ठेवत सुवर्ण जिंकले.

वरिष्ठ गटातील पदके

तिसऱया दिवसाची सुरुवात सुरुची आणि सौरभ चौधरी या जोडीने 10 मीटर एअर पिस्टल मिक्स टीममध्ये कांस्यपदक जिंकून केली. त्यांनी पात्रता फेरीत 578 गुण (सुरुची 292, सौरभ 286) मिळवत चिनी तैपेईच्या लिऊ हेंग-यु आणि हसिएह हसियांग-चेन यांच्याविरुद्धच्या कांस्यपदकाच्या लढतीत 17-9 गुणफरकाने बाजी मारली. यानंतर महिला स्कीट टीमने पात्रता फेरीत 329 गुण (महेश्वरी चव्हाण 113, गणेमत सेखों 109, रैझा ढिल्लों 107) घेत तिसरे स्थान मिळवत कांस्यपदक निश्चित केले.