जे पक्ष फोडले, त्याच पक्षांकडे मतं मागता; तुम्हाला तुमची मतं फुटायची भीती वाटत आहे का? संजय राऊत यांचा सवाल

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना तर एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला होता. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे पक्ष फोडले, त्याच पक्षांकडे मतं मागता; तुम्हाला तुमची मतं फुटायची भीती वाटत आहे का? असा सवाल राऊत यांनी केला.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे संयुक्त उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला. अर्ज दाखल करताना शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी उपस्थित होतो. एक दिवस आधी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सुदर्शन रेड्डी यांचे स्वागत करणारी आणि पाठिंबा व्यक्त करणारी विरोधी पक्षांची बैठक झाली. त्या बैठकीलाही मी आणि शरद पवार उपस्थित होतो. त्यावेळी केलेल्या भाषणात स्पष्ट सांगितले की, शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय पातळीवर बोलत आहेत. पण हुकुमशाहीविरुद्ध लढण्याची किंवा संविधान पायदळी तुडवणाऱ्या लोकांविरुद्ध आमच्या सारख्या लोकांनी, उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे अशा फोनकडे आम्ही शिष्टाचार म्हणून पाहतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष संविधानाच्या विरोधात जाऊन फोडला, आमदार-खासदार 50 कोटींना विकत घेतले आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मते मागता याचे मला आश्चर्य वाटत आहे, असेही राऊत म्हणाले.

आपल्याकडे बहुमत आहे असे म्हणता, तर तुम्हाला अशा प्रकारची मतं मागायची गरज नाही. का मतं मागताय तुम्ही आणि तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भिती वाटतेय का तुमची मतं फुटतील किंवा डुप्लीकेट शिवसेना आहे त्यांची मतं फुटतील? असा सवाल करत राऊत पुढे म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक दोन्ही बाजूंसाठी सोपी नाही. आज कागदावर मोदींकडे बहुमत दिसत आहे. पण आंध्रचे उमेदवार असल्याने तेलंगणा आणि आंध्रमध्ये अस्वस्थता आहे.

प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना आम्ही एनडीएमध्ये असतानाही मराठी म्हणून पाठिंबा दिला होता. अशा प्रकारची भूमिका आंध्र किंवा तेलंगणाचे खासदार घेतील का अशी भीती या लोकांना वाटते. शिवाय जे वातावरण राहुल गांधी यांनी निर्माण केलेले आहे, त्यामुळे क्रॉस वोटिंग व्हायची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राजनाथ सिंह देशाचे संरक्षण मंत्री आहेत. त्यांच्यावर जबाबादारी असेल, त्यांनी शिष्टाचार म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असेल. त्यात वावगे काही नाही. अशा प्रकारच्या निवडणुकीत असा चर्चा होत असतात, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्यगिरी शिकवू नये. सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे मतदार आहेत, मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे होते ना, लुंगी कसली नेसता. कोणताही राज्यपाल हा त्या राज्यामध्ये असतो तेव्हा तो राज्याचा प्रथम नागरीक असतो हे आम्हाला माहिती आहे. घटना आम्हाला माहिती असून आम्ही घटनेचे पालनही करतो. ते घटना पायदळी तुडवतात. पण राज्यपाल या राज्याचे मतदार आहेत, नागरीक नाहीत. आता यापुढे राज्याचे नाही, तर दिल्लीचे मतदार असतील. त्यांचे मूळ तामिळनाडूमध्ये आहे. मराठी माणूस दिला असता तर त्यावर चर्चा होऊ शकली असती, असेही संजय राऊत म्हणाले.