
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, अशी गर्जना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारच महिन्यांत त्याचा विसर पडला आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास हिंदुस्थानी संघाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यावरून देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून ‘अजून आमचे अश्रूही थांबले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानशी क्रिकेट खेळता, कशासाठी?,’ असा सवाल पहलगाम हल्ल्यात आप्तेष्ट गमावणाऱ्या कुटुंबियांनी मोदींना केला आहे.
पहलगामनंतर हिंदुस्थानने पाकिस्तानसोबतचे सर्व प्रकारचे संबंध तोडले. हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’चा दणका देत पाकिस्तानवर हवाई हल्ले चढवले. या कारवाईत विरोधी पक्षांसह अवघा देश मोदी सरकारच्या पाठीशी उभा राहिला. मात्र, आता केंद्र सरकारने अचानक पलटी मारली आणि आशिया चषकात पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळण्यास परवानगी दिली. या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पहलगाम हल्ल्यात 26 माऊलींचे कुंकू पुसले गेले. त्या जखमा अजूनही भळभळत असताना हा निर्णय म्हणजे या कुटुंबांसाठी मोठा आघात आहे. या कुटुंबांनी आपल्या भावना स्पष्ट शब्दांत मांडल्या असून, पाकिस्तानसोबत मैत्री नाहीच हा शब्द मोदी सरकारने पाळावा, असे कुटुंबियांनी सुनावले आहे.
सरकारने शब्द पाळावा
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा बळी गेला. त्यांच्या निधनाने मोने कुटुंबाचा आधार हरपला. या धक्क्यातून मोने कुटुंब अद्यापही सावरलेले नाही. पहलगामच्या हल्ल्याला अवघे चारच महिने झाले आहेत याची आठवण करून देत मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी पाकिस्तानसोबत हिंदुस्थानने क्रिकेट का आणि कशासाठी खेळायचे, असा सवाल केला. पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचा केंद्र सरकारने दिलेला शब्द पाळावा. पाकिस्तान हिंदुस्थानवर वारंवार हल्ले करतो. पाकिस्तानशी संबंध ठेवणे म्हणजे त्यांना पाठीशी घालणे होईल, असे त्या म्हणाल्या.
आम्हाला हे मान्यच नाही
पहलगाम हल्ल्यात बळी गेलेले डोंबिवलीचे संजय लेले यांचा मुलगा हर्षद लेले याने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे सपशेल चुकीचे आहे, असे ठणकावून सांगितले. हा सामना होणे आम्हाला कदापि मान्य नाही, असेही हर्षद याने बजावले.