राधाकृष्णनना पाठिंबा शक्य नाही… ते वेगळ्या विचाराचे आहेत, फडणवीसांनी फोन करून केलेली विनंती नाकारली

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून केली होती. त्याबाबत शरद पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. फडणवीसांचा पह्न आला होता, राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत म्हणून सहकार्य करावे अशी विनंतीही त्यांनी केली होती, मात्र मी शक्य नाही म्हटलं. कारण ते वेगळय़ा विचाराचे आहेत,  अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

बॅलार्ड पियर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूक व अन्य मुद्दय़ांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत भाष्य करताना त्यांनी ‘इंडिया’ आघाडीनेही एकमताने आपला उमेदवार जाहीर केला असल्याचे सांगितले. आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी दोन-तीन नावांची चर्चा केली आणि त्यामध्ये सुदर्शन यांच्या नावावर एकमत झाले असे ते म्हणाले.