
आशिया चषक 2025 मध्ये पाकिस्तान सोबत खेळण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयावर चौफेर टीका होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट म्हणजे शहिदांचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा अपमान असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
पत्रात संजय राऊत म्हणतात, पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू अजून थांबलेले नाही आणि तरीही पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिला हे प्रत्येक देशवासीयासाठी वेदनादायक आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाच्या परवानगी शिवाय हे शक्य नाही.
पाकिस्तान विरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू आहे आणि तणाव कायम आहे असे आपण म्हणता, मग त्यांच्यासोबत क्रिकेट कसे काय खेळायचे? पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यात 26 महिलांचे कुंकू पुसले गेले, या माता-भगिनींच्या भावनांशी आपण खेळत आहात का? पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळला नाहीत तर व्यापार थांबवू अशी धमकी प्रे. ट्रम्प यांनी दिलीय का? असा सवाल राऊत यांनी केला.
‘रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही’, असे आपण म्हणता, मग ‘रक्त आणि क्रिकेट’ एकत्र कसे चालेल? पाकिस्तान सोबत सामना म्हणजे मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी आणि ऑनलाइन जुगार. यात भाजपशी संबंधित अनेक लोक गुंतलेले आहेत. गुजरातमधील जय शहा सध्या क्रिकेटचा कारभार पाहत आहेत. मग यातून भाजपला मोठा आर्थिक फायदा होतो का? अशा एकामागून एक सवालाच्या फैरी राऊत यांनी झाडल्या.
Honorable Prime Minister,⁰The blood of the Indians killed in the Pahalgam attack has not yet dried, and the tears of their families have not yet stopped.⁰Even so, playing cricket matches with Pakistan is inhumane!
@narendramodi
@AmitShah
@BCCI pic.twitter.com/eSSBmVALLo— Sanjay Raut (@rautsanjay61) August 23, 2025
पाकिस्तान सोबत क्रिकेट म्हणजे फक्त जवानांच्या शौर्याचा अपमान नसून कश्मीरसाठी शहीद झालेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासह प्रत्येक जवानाचा अपमान आहे. हे सामने दुबईत होत आहेत, मात्र हे सामने महाराष्ट्रात झाले असते तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने नक्कीच रोखले असते. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे म्हणजे शहिदांचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा अपमान आहे. सरकारच्या या निर्णयाचा शिवसेना तीव्र शब्दात निषेध करते, असेही राऊत यांनी पत्रात म्हटले.