
राज्याच्या परिवहन विभागाने स्कूल व्हॅनसाठी 13 विद्यार्थी आणि एक चालक असे धोरण अखेर मान्य केले आहे. यासाठी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना आणि अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाने आठ वर्षे सरकार दरबारी पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱया सात आसनी लहान वाहनांविरोधात एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यादरम्यान स्कूल व्हॅन बंद करण्याबाबत न्यायालयाचा कोणताही निर्णय नसताना परिवहन विभागाने अशा स्कूल व्हॅनला परवाने देणे बंद केले. त्यामुळे मुंबईसह ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वाहतूक सेना आणि अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी महासंघामार्फत न्यायालय आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश येऊन परिवहन विभागाने आदर्श स्कूल बस आचारसंहिता तयार करून ती लागू केली. त्यातूनच 13 विद्यार्थी व एक चालक अशी आसनक्षमता असलेल्या स्कूल व्हॅन आणि बसला मान्यता दिली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, उपाध्यक्ष मनोज पावशे, सरचिटणीस घनश्याम सांडीम, सूर्यकांत तांडेल, अजिम सय्यद, सिद्धिकी शेख यांनी सातत्याने पाठपुरावा केला.