
गेल्या १३ वर्षांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे मराठा समाजासाठी हॉकी स्टेडियम परिसरातील मराठा भवनसाठी नियोजित असलेली जागा अचानक महायुतीचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे जनसुराज्य-भाजपचे आमदार अशोक माने यांच्या एका संस्थेला देण्यास नुकतीच मंत्रिमंडळाच्या वें बिनेटमध्ये मंजुरी देण्यात आल्याने, मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे.
कोल्हापूरशी फारसा संपर्क नसलेल्या आमदारांनी मराठा समाजाच्या भावनांचा विचार करावा; अन्यथा त्यांना मराठा समाजाचा रोष परवडणार नाही, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांनी शुक्रवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत दिला. या संवेदनशील प्रश्नासंदर्भात सोमवार, दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी मराठा समाजातील कार्यकर्ते व ज्येष्ठांची बैठक घेऊन, पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही मुळीक यांनी सांगितले.
मराठ्यांच्या राजधानीची कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांत ५० टक्केपेक्षा जास्त मराठा समाज असूनही मराठा भवनची उणीव भासत आहे. हैदराबाद, बंगळुरू, बेळगाव, निपाणीसह महाराष्ट्रातील सांगली तसेच अन्य शहरांत मराठा भवन आहेत; पण कोल्हापूर येथे मराठा भवन नाही. त्यामुळे कोल्हापूरची ही गरज लक्षात घेता, सन २०१४ साली कोल्हापूर येथील रि.स.नं. ६९७/३/३ यल्लामा देवालयाजवळ, आयटी पार्कशेजारी, हॉकी स्टेडियम रोड, कोल्हापूर येथील जागेची मागणी तत्कालीन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे केली. विविध कार्यालयातील ना हरकती घेऊन एक परिपूर्ण प्रस्ताव महसूल विभाग कार्यालय पुणे त्यानंतर मुंबई सचिवालय येथे गेला. सध्या हा प्रस्ताव सचिवालय येथे कार्यासन क्र. ५ येथे प्रलंबित आहे.
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या जागेचा पाठपुरावा करताना सर्वसामान्य मराठ्यांसह इतर समाजातील व्यक्तींनीही उत्स्फूर्तपणे लाखो रुपयांचा निधी जमा केला आहे. गेली तेरा वर्षे सातत्याने या जागेच्या पाठपुराव्यामुळे सर्वांच्या मनामध्ये ही जागा मराठा भवनसाठी राखीव असल्याची ठाम भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठा समाज या जागेचा हक्क सोडणार नसल्याचे वसंत मुळीक यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूरशी ज्यांचा फारसा संपर्क नाही अशा आमदार अशोक माने यांनी नुकत्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही जागा त्यांच्या संस्थेस मंजूर करून घेतल्याचे समोर आले आहे. त्यांच्या महिला औद्योगिक संस्थेस ही जागा मिळण्यास आमची कोणती हरकत नाही. पण त्यांनी हीच जागा का मागणी केली हे काही कळत नाही. ही बाब इथल्या स्वाभिमानी सर्वसामान्य जनतेला व मराठ्यांना अजिबात पचनी पडलेली नसून, मराठा समाजातून रोष व्यक्त केला जात आहे. यावेळी शशिकांत पाटील, शंकर शेळके, चंद्रकांत चव्हाण, प्रताप नाईक, आर. डी. पाटील, शाहीर दिलीप सावंत, संयोगीता देसाई आदी उपस्थित होते.