
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ईडीनंतर आता सीबीआयनेही अनिल अंबानी यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. यानंतर शनिवारी सीबीआयचे पथक मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. आरकॉम आणि अनिल अंबानीशी संबंधित ठिकाणी ही शोध मोहीम सुरू आहे. एसबीआयच्या तक्रारीनंतर सीबीआय ही छापेमारी करत आहे.
याआधी ईडीने अनिल अंबानी यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर काही दिवसांनी ही शोध मोहीम हाती घेण्यात आली. सीबीआयने अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 6 ठिकाणी छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने कंपनीविरुद्ध बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कर्ज घोटाळ्यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. एसबीआयने 13 जून 2025 रोजी याला “फसवणूक” म्हणून वर्गीकृत केले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या फसवणूक जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे आणि बँकेच्या बोर्ड-मंजूर धोरणानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर, 24 जून 2025 रोजी बँकेने आरबीआयला कळवले आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. आता सीबीआयने औपचारिक गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वी बँक फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांची चौकशी केली होती. ही चौकशी नवी दिल्लीतील ईडी मुख्यालयात करण्यात आली. यावेळी 17,000 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याबाबत अनिल अंबानी यांची अनेक तास चौकशी करण्यात आली.