सर्जियो गोर यांची हिंदुस्थानात अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती, टैरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानसोबतच्या टॅरिफ वॉरच्या काळात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले जवळचे सहकारी आणि व्हाइट हाउसचे कार्मिक संचालक सर्जियो गोर यांची हिंदुस्थानात अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच, गोर यांना दक्षिण आणि मध्य आशियाई प्रकरणांसाठी विशेष दूत म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. हा निर्णय 22 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला.

सर्जियो गोर कोण आहेत?

सर्जियो गोर हे डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी आणि राजकीय सल्लागार आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गोर यांनी डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्यासोबत ‘विनिंग टीम पब्लिशिंग’ या प्रकाशन संस्थेची सह-स्थापना केली. ज्याअंतर्गत ट्रम्प यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.

तसेच ट्रम्प यांच्या समर्थनार्थ कार्यरत असलेल्या एका मोठ्या सुपर पीएसीचेही संचालन गोर यांनी केले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया मंचावर गोर यांच्या नियुक्तीची घोषणा करताना त्यांचे कौतुक केले आणि म्हटले की, “सर्जियो माझे मित्र आणि सहकारी आहेत. त्यांनी माझ्या निवडणूक मोहिमेपासून ते प्रकाशनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत काम केले आहे. ते या क्षेत्रासाठी उत्कृष्ट राजदूत ठरतील.”