
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी (22 ऑगस्ट) कोलंबो येथे गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) अटक केली आहे. त्यांच्यावर त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात वैयक्तिक प्रवासासाठी सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. विक्रमसिंघे यांना कोलंबो फोर्ट मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले असून, त्यांना 26 ऑगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. श्रीलंकेतील माजी राष्ट्रपतींना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रानिल विक्रमसिंघे यांच्यावर 2023 मध्ये लंडनला केलेल्या खासगी दौऱ्यासाठी सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2023 मध्ये क्युबातील जी-77 परिषदेला हजर राहून परतताना त्यांनी लंडनमध्ये थांबून वुल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठातील एका समारंभात भाग घेतला होता, जिथे त्यांच्या पत्नी मैत्री विक्रमसिंघे यांचा सन्मान करण्यात आला होता. या दौऱ्यासाठी सुमारे 1.69 कोटी रुपये (श्रीलंका रुपये) खर्च झाल्याचा दावा सीआयडीने केला आहे. हा दौरा खासगी होता, परंतु त्यासाठी सरकारी निधी आणि सुरक्षारक्षकांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, विक्रमसिंघे आणि त्यांच्या कार्यालयाने या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पत्नीच्या प्रवासाचा खर्च त्यांनी स्वतः केला असून, सरकारी निधीचा कोणताही गैरवापर झालेला नाही. तसेच लंडनमधील दौरा हा क्युबा आणि अमेरिकेतील अधिकृत दौऱ्याच्या मार्गावरील थांबा होता, ज्यामध्ये काही राजनैतिक भेटींचाही समावेश होता, असे त्यांचे कार्यालय म्हटले आहे.