हिंदुस्थानने अमेरिकेच्या डाक सेवेवर लावली तात्पुरती बंदी, 25 ऑगस्टपासून लागू होणार निर्णय; कारण काय?

हिंदुस्थानी डाक विभागाने अमेरिकेच्या नव्या सीमा शुल्क नियमांमुळे 25 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेसाठी सर्व प्रकारच्या डाक सेवांवर तात्पुरती बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ही कारवाई अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानसह इतर देशांवर लादलेल्या 25 टक्के टॅरिफच्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली आहे. मात्र 100 डॉलरपर्यंतच्या किंमतीची पत्रे, कागदपत्रे आणि भेटवस्तू या बंदीतून वगळण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

अमेरिकेने 30 जुलै 2025 रोजी जारी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार (एक्झिक्युटिव्ह ऑर्डर 14324), 800 डॉलरपर्यंतच्या वस्तूंवरील सीमा शुल्कमुक्त सवलत 29 ऑगस्ट 2025 पासून रद्द करण्यात येणार आहे. यामुळे अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या सर्व डाक वस्तूंवर, त्यांच्या किंमतीची पर्वा न करता, आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा (IEEPA) अंतर्गत सीमा शुल्क लागू होईल. याशिवाय डाक वस्तूंवरील शुल्क वसूल करण्यासाठी आणि जमा करण्यासाठी अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण (CBP) यांनी पात्र पक्ष नियुक्त करणे आवश्यक आहे. मात्र 15 ऑगस्ट 2025 रोजी सीबीपीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनंतरही शुल्क वसुली आणि हस्तांतरणाच्या प्रक्रियेबाबत अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणी कायम आहेत. यामुळे अमेरिकेला जाणाऱ्या हवाई वाहकांनी 25 ऑगस्टनंतर डाक वस्तू स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे बोलले जात आहे.

कोणत्या सेवा बंद होणार?

हिंदुस्थानी डाक विभागाने 25 ऑगस्टपासून अमेरिकेसाठी सर्व प्रकारच्या डाक वस्तूंची बुकिंग तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सामान्य पत्रे, पार्सल आणि इतर डाक वस्तूंचा समावेश आहे. मात्र खालील गोष्टींना या बंदीतून सूट देण्यात आली आहे:

– 100 डॉलरपर्यंतच्या किंमतीची पत्रे
– कागदपत्रे
– भेटवस्तू